पान:Samagra Phule.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ३७ नवीन पुस्तके या सदराखाली या पवाड्याबद्दल माहिती देताना सत्यदीपिकाकार बाबा पदमनजी यांनी म्हटले होते, "शिवाजीचा पवाडा' हे पुस्तक रा. जोतिबा गोविंदराव फुले यांनी केले आहे. रा. जोतिबांचे नाव पुण्यात प्रख्यात आहे. काही वर्षांमागे त्यांनी तेथे महार-मांगांच्या शाळांची स्थापना करण्यात पुष्कळ खटपट व श्रम केले. म्हणून सरकारने त्यांस शालजोडी दिली. हे गृहस्थ जातीभेदविवेकसार पुस्तकाचे मालक आहेत. या त्यांच्या पवाड्याची भाषा साधारण लोकांस समजण्याजोगी सुलभ आहे. याची शब्दरचना सुंदर आहे. (पहा : "सत्यदीपिका", वर्ष ९, अंक ८, ऑगस्ट १८६९). हा पवाडा लिहिताना जोतीरावांनी मुख्यतः ग्रॅण्ट डफच्या “हिस्टरी ऑफ द मराठाज्' या इंग्रजी पुस्तकाच्या पहिल्या खंडातील शिवछत्रपतींबद्दलच्या मजकुराचा उपयोग केलेला दिसतो. ग्रॅण्ट डफने कृष्णाजी अनंत सभासदाची बखर, मल्हार रामराव चिटणीसांची बखर, जावळीची बखर, काफीखान या टोपण नावाने लिहिणाऱ्या मोहम्मद हशीमखान याने औरंगजेबाच्या कारकिर्दीसंबंधी लिहिलेला ग्रंथ सय्यद मोईद्दीन पीरजादाने लिहिलेला विजापूरचा इतिहास वगैरे मराठी व फार्सी साधनांचा उपयोग केलेला आहे. त्यामुळेच जोतीरावांनी पवाड्याच्या प्रस्तावनेत “अतिजुनाट यवनी व मेसर्स ग्रांडफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे' असे म्हटले आहे. चांभारगोंद्याचा सावकार शेष नाईक पुंडे याच्याकडे मालोजी राजे भोसल्यांनी आपल्याला मिळालेले द्रव्य ठेव म्हणून ठेवले होते आणि त्यांनी त्याचा उपयोग तळी खोदण्यात, विहिरी बांधण्यात केला असे ग्रॅण्ट डफने म्हटले आहे. या माहितीचा जोतीरावांनी वापर केला आहे. शिवाजी राजांनी फिरंगोजी नरसाळा या किल्लेदारास वश करून चाकणचा किल्ला घेतला. त्यांनी सुप्यावर रात्री छापा घालून बाजी मोहित्यास त्याच्या तीनशे घोड्यांनिशी ताब्यात घेतले आणि मुसलमान किल्लेदारास लाच देऊन कोंडाणा किल्ला घेतला. कल्याणचा सुभेदार मुलाना अहमद (मुल्ला अहमद) याने विजापुरला पाठवलेला खजिना वाटेत लुटला आणि आबाजी सोनदेवाने कैद केलेल्या कल्याणच्या सुभेदाराची सन्मानाने विजापुरास रवानगी केली असे ग्रॅण्ट डफने लिहिले आहे. पवाड्याचा हा भागही जोतीरावांनी ग्रॅण्ट डफला वाट पुसतच लिहिलेला दिसतो. बाजी घोरपड्याने दगलबाजी करून शहाजी राजांना केलेली अटक, सईबाईंचा सल्ला घेऊन शिवाजी राजांनी शहाजहानशी साधलेला संपर्क, बाजी शामराजाचा शिवाजी राजांनी केलेला पराभव, त्यांनी बाजी घोरपडे व चंद्रराव मोरे यांना कसा धडा शिकवला त्याची हकीगत वगैरेंचा निर्देश करतानाही जोतीरावांनी ग्रॅण्ट डफचाच आधार घेतलेला आहे. अफझलखान वधाचे फुल्यांनी केलेले वर्णनहीं ग्रॅण्ट डफने दिलेल्या हकिगतीशी तंतोतंत जुळते. पंताजी गोपीनाथ या अफझलखानाच्या ब्राह्मण वकिलाने त्याचा विश्वासघात केला अशी ग्रॅण्ट डफप्रमाणेच जोतीरावांचीही समजूत होती. त्यामुळे पंताजी गोपीनाथासंबंधी त्यांनी "लोभी ब्राह्मण",