Jump to content

पान:Samagra Phule.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

विदूषक : धन्य ! ! धन्य तुमचा तारणारा कीं ज्याने या सर्व माळ्या कुणब्यास इंग्रजी सरकारच्या हातून तारण्याविषयी (ब्राह्मणाची नजर चुकारून) सतत उपाय चालवलाच आहे.
जोशी: बोला, येऊ द्या तुमचा येशू ख्रिस्त; (कुणब्याकडे तोंड करून म्हणाला) जा, बाबा बाट ! याचा उपदेश ऐक, कमी करू नको, म्हणजे पुष्कळ गांव खायाला मिळतील. (असे म्हणून तेथेच एके बाजूला तरफडत उभा राहिला).
विदूषक: हे काय या जोशास ठावें कीं येशू ख्रिस्त याच्या चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला सुद्धा कांही दिवसांनी वाढवावयास (शुद्ध करण्यास) कधी कमी करणार नाही.
पाद्री: पाटील बुवा ब्राह्मणाची मुले शिकत राहिली, आणि तुमच्या लोकांचीच मुलें का निघाली ?
बाईचा नवरा : (जीशाच्या तोंडाकडे पाहून कांही भ्याल्यासारखा करून) साहेब आता मी काय सांगू? तुम्हाला कां कळत नाही ?
विदूषक: कुणच्या माळ्यांचा हाच तर मोठा वेडेपणा की सरकारास अथवा साहेब लोकास यांनी आपली सर्व दुःखे आपल्या स्वमुखांनें सांगितल्याशिवाय त्यांना यांची दुःखे कशी कळतील, व इंग्रज सरकारने तरी कोठवर दुःखें मनी जान होऊन, निवारण करावीत ? दिवसा अंध खरें.
पाद्री: पाटील बुवा ब्राह्मण बुवास भिवू नका, सांगा काय जे खरे असेल ते म्हणजे मी ज्ञानोदयांत कांही कोणाचें भय न धरिता छापून प्रकट करीन.
विदूषक : हे एक माझे भविष्य ध्यानांत असूं द्या, बरे ? पुढें कांही दिवसांनी ज्ञानोदयाची किम्मत कुणब्याच्याने करवणार नाहीं.
जोशी: (हळूच कोणास ऐकू न जावे म्हणून, जोगाईकडे तोंड करून) जोगाई तुझ्या नवन्याला वेड तर लागले नाही? आतां तुझा नवरा साहेब लोकांची बरोबरी करायास लागला, पण घरी भांडी कोणी घासावीत बरें ?
विदूषक: वाहवारे इंग्रज लोक की ज्यांची बला ईश्वर दूर करो !!! कारण जे नेहमी कुणाच्या माळ्यांस आपल्या बरोबर करूं पाहतात आणि ब्राह्मण त्यास भांडी घासणारें करूं इच्छितात.
बाई : (बायको कुणब्याची) महाराज, तुमची सर्व कामाची मेली घाईच ! थांबा, साहेब पहा कसा तुम्हा ब्राह्मणापेक्षाही दिवाविषयी बोलतो) चांगले बोलणे बोलतो, ते जरा मला पण ऐकू द्या--
विदूषक : सत्य बोल सर्वास आवडू लागतात हे उघड सिद्ध आहे ना.