तृतीय रत्न
विदूषक : असे असे मार्गावर या साहेब केवळ सुधारल्या ब्राह्मणांच्या मसलतीवर भरवसा ठेवून त्यांच्या धोरणानेच चालू नका.
बाईचा नवरा: आतां मीच तुम्हाला कसे म्हणून सांगू?
पाद्री : सांगा तुम्हीच कां सांगा ना ? कारण कोणी कोणाची अक्कल वाटली नाही.
बाईचा नवरा : मला असे वाटते की सरकारी बोर्ड ऑफ इज्युकेशनच्या द्वारे, असा एक नेम करून टाकावा की दर खेडेगावांनी माळ्या कुणब्यांच्या वस्तीचा अनुमान करून, त्यांची मुले शाळेत अमूक असावीत जर, कदाचित तितकी मुलें गांवकरी भरती करून देणार नाहीत तर, एकदम तेथील शाळा मोडली जाईल. मग पाहू बरें! हे हेच ब्राह्मण लोक, आम्हा कुणव्या माळ्यास, मुले शाळेत पाठवावीत म्हणून उपदेश करू लागतील: शेवटी असे सुद्धा म्हणू लागतील की, अहो माळ्या कुणब्या हो, मागे जे शास्त्रांत लिहिले आहे की, शूद्रांनी लिहिणें शिकू नये ते सर्व खोटे आहे.
विदूषक : साहेब असे न म्हणून काय करतील. कारण कुणबी माळी जर आपल्या मुलांस विद्या शिकण्यास पाठवणार नाहीत तर त्यांच्या मुलाला (त्यांच्या मुलाकरिता) विद्या न मिळतां काही दिवसांनी माळ्या कुणब्यांच्या मुलांच्या पंक्तीत जाऊन बसावे लागेल यालाच "बाप दाखीव नाहीतर पिंड पाड" असे म्हणतात. परंतु साहेब ह्या सर्व कुणब्यांच्या बोलण्यावर सरकार लक्ष पुरवील काय ? पुरविल्यास पुढे फारच कुणब्यांचे बरे होईल असे मला पण वाटते.
पाद्री: पाटील बुवा जर सर्व कुणब्या माळ्यांनी आपली मुलं घरी ठेवून घेतलीत. यावरून ती शाळा मोडली असेल नाही बरें ?
बाईचा नवरा : मोडतील कशानें? तेथे काही ब्राह्मणांची मुले होती ती येत असत, विदूषक : असे कसे होईल! जातींच्या मुलाला गोडी गुलाबीने न शिकविता कोणी मारीत असतो काय ?
( तिकडे ब्राह्मणांनी आशीर्वाद म्हटल्यानंतर, त्यातून जोशानें हातात पळीसुद्धा पंचपात्री घेऊन, जोगाईच्या नवऱ्याच्या पाठीमागे उभा राहून, त्यास असे म्हणाला- कां बाबा घरी चालतोस ना ?)
पाद्री : अहो भटजी याला माझ्याबरोबर बोलू द्या.
विदूषक : पण जोशाला हे काय ठावें की पाद्रीने एव्हढा वेळ श्रम करून कुणब्याला. राघूसारखा पढवून, उलटा जोशाचा पंतोजी होण्याजोगा तयार केला आहे.
पाद्री : अरे बाबा आम्ही अज्ञानाचेच बरोबर बोलावयास आलो आहोत व आमच्या तारणाऱ्याची आज्ञा ही अशीच आहे.