पान:Samagra Phule.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न २१ कुणबी : (मान हालवून म्हणाला) बरे महाराज आमचे नशीब म्हणून आम्हास प्रसाद मिळाला; (असें म्हणून ते सर्व अन्न दोघांनी एकीकडे बसून चाटून पुसून, खाऊन, पोटभर पाणी पिऊन दमदमीत दुसऱ्या ओळचणींखाली सावलीत जाऊन बसली.) विदूषक : (कुणब्याकडे तोंड करून म्हणाला), अरें तुझे नशीब म्हणूनच जोशाने तुझ्या बायकोजवळून, मुठभर भिक्षेच्या जागी पायलीभर दाणे, एक पावली, एक शिवराई व सुपारी आणि तुझ्या जवळून डबीच्या (मिषाने) एक पावली हे सर्व तुम्हा उभयतांजवळून उपटून नेलें व दुसरें त्या जोशाचे नादी लागून, धनी, दुकानदारापासून चार दिवसाचा खाडा मांडवून, त्याबद्दल तूं आपल्या आठ आणे मिळकतीवर पाणी घालून बायकोला जामीन व आपण कूळ होऊन दहा रुपयांकरितां साडेबारा रुपये आपल्या बोडक्यावर अंधासारखे शेकून घेऊन रात्र आणि दिवस चार रोज गुलामासारखी ब्राह्मणभोजनाची तयारी केलीस! व जोशाचे नशीब म्हणून त्याने काही श्रम केल्याशिवाय तुजकडून भोजनखर्च करवून आपल्या दामूभावास फुकट्या फाकटी तुजजवळून धोतरजोड्याकरितां रुपये देववून त्यांने आपले सर्व भाऊबंद सोयरें धायरें व घरची दारची माणसे यास आपल्या पंक्तीला घेऊन तुझ्या अगोदर भोजन सारून उठला; व त्याने तुला काल रोजी उचलू लागण्याचा सुद्धा कंटाळा केला. तथापि, त्वा निलाजऱ्यासारखें सर्व सामान सुमान तसेच त्याच्या घरी वाहून, आज दहा वाजेतोपर्यंत त्याचे घरी त्वा कामाचा चेंध उपसून, नंतर जोशाच्या सांगितल्यावरून तूं आपल्या गरव्हार सरहार बायकोला घेऊन, बारावर एक वाजली नाही तोच येऊन सुमारे साडे चार वाजेतोपर्यंत उन्हाच्या झळा वाहणाऱ्या या सावलीत तिजला दीनासारिखा शेजारी घेऊन बसून, शेवटी जोशाने थोडे शिजले अन्न तुझ्या पदरांत दुरून टाकून तुला दूर बसून, खा म्हणाला. यावरून तुझ्या नशिबासारखे नशीब या भूमंडळावर तरी कोणाचे आहे काय ! ! ! ! ! नाही! तुजसारखा वेडा, ब्राह्मणाचे (अशा ख्रिस्ती मतानुसारी इंग्रजांच्या राज्यांत) ऐकून फसणारा मला तर हिंदुस्थानाखेरीज दुसरे कोणत्याच ठिकाणी या भूमंडळावर सापडणार नाही. (नंतर ब्राह्मणी ज्ञानप्रकाशाच्या तोंडाजवळ हात नेऊन म्हणाला) कारे बाबा, तुझे जातवाले ब्राह्मण, आतां तुझ्या नजरेसमोर असे करीत आहेत किंवा नाही ? हे खरे असल्यास छापून प्रसिद्ध कर बरें? नाहीतर लाजशील बिजशील! (यापुढे, सुमारे साडेचार वाजतां तिकडे सर्व ब्राह्मणांनी देवळाकडे जाण्याची तयारी करून बाहेर बसलेल्या कुणब्यास व त्याच्या बायकोस देऊळी घेऊन जाऊन तेथे सर्व ब्राह्मण मोठ्या दीर्घ स्वराने एकदम ओरडून, आशीर्वाद देण्यास आरंभ केला; इतक्यात तेथे पाद्रीसाहेब देवळाच्या एके बाजूला उभा राहिलेल्या अज्ञानारोपीत कुणब्यास उपदेश करू लागला; त्यावेळी या सर्व ब्राह्मणांनी त्याच्या मनांत उपदेश ठसूं नये, म्हणून कसकशी होळकर गर्दी केली, तिजकडे आपण थोडेसे लक्ष पुरवू या.) पाद्री : कां पाटीलबुवा तुम्हाला देव किती आहेत याविषयी काही माहीत आहे का? बाईचा नवरा : माहीत नाही तर कां, तुझ्यासारखे देवरहित आहों काय?