पान:Samagra Phule.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रन १५ जोशी : मग काय काय करावें! तुझ्या करिता तेव्हड्यातच काटकसर करून, कसे ना कसे तरी पुरवून घेतलेच पाहिजे, कारण जसें अंथरुण असेल तसे पाय पसरावे, असे जाणून मी त्याला एका धोतर जोडा मात्र देण्याचे कबूल केले आहे. विदूषक : या सर्व जोशाच्या काटकसरीविषयींच्या बोलण्यात कपट नाही असे तुम्हाला वाटते काय? बाई : (मोठ्या आनंदाने टाळ्या पिटून म्हणाली) मग काय महाराज तुमच्या बेताला पाहावयाचे. जोशी : मग अकरा दिवस त्याला जपाला बसविण्याचे ठरवू ना? बाईचा नवरा : हं, बेलाशक या दहा रुपयांत जे पाहिजेल ते करा. तुम्ही मुखत्यार आहात, आम्हाला विचारावयास सुद्धा येत जाऊ नका. जोशी : बरे तर आतां मी जातो; परंतु तुम्ही गहू तांदुळास निसून, चांगले बारीक गहू मात्र दळून ठेवा, (म्हणून घरी गेला) (नंतर कांही एका दिवसांनी बाईच्या नवऱ्याने आपल्या धनी दुकानदारास चार दिवसांची रजा सांगून पाठविली. आणि ब्राह्मणभोजनाचा दिवस आला नाही तोच, सर्व तयाऱ्या करून ठेवल्या. पुढे जेवणाच्या आदले दिवशी जोशाची स्वारी याचे घरी येऊन, दारांतच उभी राहून मोट्या डौलाने कंबरेवर हात ठेवून म्हणाली -- कारे बाबा कसे काय? सर्व तयारी ना?) बाईचा नवरा : (हात जोडून म्हणाला), महाराज आम्हाकडून सर्व तयार आहे पण तुमच्या जपाविषयी कसे काय? जोशी : वेड्या, तुला अद्याप कसे ठाऊक नाही! अरे आज दहा दिवस झाले ना! पंचसुख्या मारुती जवळ दामू दररोज जप करीत असतो ना! वा! कोण ही अंदाधुंदी? विदूषक : दामूने (दहा दिवस कुणबी कसे बुडवावेत) याखेरीज दुसरा कोणता तरी जप केला असेल काय? बाईचा नवरा : असे जर आहे, तर फारच बरे झाले; परंतु आम्हाला कळविले जर असते, तर आम्ही त्याच्या पायाबिया पडावयास आलो असतो. जोशी : आता ते सर्व उद्या होईल. घाबरा का होतोस? पण मला असे वाटते, हे सर्व सामान तू आमच्या घरी आज संध्याकाळपर्यंत वाहून ठेव, म्हणजे आपण सर्व माझ्याच घरी बेताबेताने करून टाकू; कारण एक तर तुझे घर फार लहान व दुसरे तुझे येथे भांड्या- कुंड्याची ददाद, (असे म्हणून घरी तर एकदाचा गेला) विदूषक : जोशाने आपल्या घरी बेत ठरविल्याने उरलेसुरले सामान कुणब्याच्या हाती न लागतां, तसेच आपल्या हाती लागले, म्हणून कुणब्यास भलत्याच बाबी सांगून, पंडितांनी आपल्या घरचा बेत ठरविला नाही कशावरून?