पान:Samagra Phule.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय बाईचा नवरा : बरे महाराज, मी एकदोन रोजांत कशी ना कशी पाच रुपयांची तजबीज करून तुमच्या स्वाधीन आणून करतो; मग त्याचे तुम्ही पुढे ब्राह्मणभोजन घाला; नाहीतर जसें तुम्हाला कळेल तसे करा. जोशी : तू वेडा तर नाहीस? जसे कळेल तसे करा म्हणजे या तुझ्या बोलण्याचा अर्थ काय होतो रें? हे मला सांग कसे? बाई : महाराज त्यांच्या बोलण्याचा तुम्हाला राग येऊ देऊ नका, आम्ही किती केले तरी कुणब्याची जात; आम्ही नांगर हाकूनच रहावे. तुम्हाशी कसे बोलावे हे आम्हाला काय ठावे? विदूषक : या नांगरहाक्याच्या बायकोला हे काय ठावें, की कुणब्याने नांगर हाकतां हाकतां विद्या जर शिकली असती तर, खचित जोशी तर केव्हाच कोणीकडेसच टिरीला पाय लावून, पळाला असतां, पण या बाईच्या अशा ह्या बोलण्यावरून, दोहो हातांनी (भूदेवासारखी) पोटभर पुजा करण्यास कधी कमी केले नसते. जोशी : यात काही कमी नाही, तू बोललीस ते सर्व सत्य आहे; परंतु बाई जर कदाचित हे पांच रुपये पुरे झाले नाहीत तर का मी आपल्या घरची भांडीकुंडी तुझ्या ब्राह्मणाच्या भरीस घालू काय? विदूषक : कुणब्याची भांडी असतां जोशी आपली भांडी ब्राह्मणाच्या भरीस कशी घालील बरें? बाईचा नवरा : महाराज, मी चुकून बोललो. असे का म्हणता? परंतु त्या भोजनास खर्च निदान रुपये तरी किती लागतील, हे मला एकदम सांगा, कारण दोनदा कर्जरोखे लिहून दिल्याने कागद लिहिणारांस मात्र व्यर्थ दुप्पट पैसे द्यावे लागतील. जोशी : बरे बाबा! जा दहा रुपये कर्ज काढून आण, म्हणजे त्यामध्ये जप करण्यास सुद्धां ब्राह्मणांस बसवीन, म्हणजे एकदम सर्व खटपट वारली. विदूषक : जोशीच्या हिशोबी कुणब्याचे काही का होईना, आपला पोटमा भरला म्हणजे झाले ना? बाईचा नवरा : असे समजून, उमजून, सांगा महाराज. आम्ही नाही म्हणू तर आमच्या कानाला खडा लावा. आता जा, तुम्ही पुन्हा अमावास्येच्या दिवशी या म्हणजे आपण लागलेच प्रतिपदेचा बेत करून टाकू. जोशी : तुमचा चाकर लागला असेल! आता जा आणि उद्या या, असे हेलपाटे घालीतच बसा. बाई : महाराज तुम्ही हेलपाट्याविषयी काही काळजी करू नका, मी काही तुम्हाला आणखी देईन. मी तुमचा उपकार ठेवणार नाही. (असे बाई बोलताच जोशाने घरचा रस्ता धरला.