Jump to content

पान:Samagra Phule.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तृतीय रत्न

99

बाईचा नवरा : तुमची डबी काय किंमतीची होती, महाराज ?
जोशी : बाबा, तुला काय सांगू! ती मला तुजसारख्या एका माझ्या यजमानानें, धर्मबुद्धिनें दिलेली होती. मला तिची किंमत कशावरून माहित असेल ? परंतु मुंबईची किंमत चार आणे असावी असे अनुमान होते.
बाईचा नवरा : ही घ्या महाराज मजजवळ चार आणी आहे; पण तुम्ही उदास होऊ नका!
जोशी : (मनात कदाचित याच्या बायकोने मागल्या पावलीविषयी याजजवळ सांगितले असल्यास कुणब्याला माझी ठकबाजी समजून, केवळ माझे मन तर पाहात नाही; असा विचार करून, काही चमकल्यासारखा करून म्हणाला) नको, नको मला तुझी पावली... आम्ही तुम्हा गरिबाला कोठवर छळावे ? पण काय करू ? तुझ्या घरी आलो नसतों, तर मज ब्राह्मणाचा एव्हढा तोटा झाला नसता.
बाईचा नवरा : असे जाणूनच महाराज, आपणास पावली देत आहे. आपण याविषयीं कांही मनांत आणू नका, मी आपल्या स्वसंतोषाने देतो.
जोशी : बरें, ईश्वर तुझें कल्याण करो. (असें म्हणून जोशाने हातोहात कुणब्याच्या जवळची पावली बाधीवाल्यासारखी उडवली.)
विदूषक : जोशानें डबीच्या निमित्ताने किती सफाईने कुणब्याची पावली हरण केली हे तुमच्या लक्षांत आले ना ?
बाई : महाराज आपण थोडे स्वस्थ व्हा; आणि माझ्या पतीस आपण मागे सांगितल्या ब्राह्मणभोजनास काय खर्च लागेल तो सांगा. आमचा तुमच्या सांगण्याप्रमाणे बेत ठरला आहे.
जोशी : बरें तर, मजकडून कोणती हरकत आहे? आम्ही तुम्हास सांगावें मात्र आणि तुम्ही त्याप्रमाणे करावें म्हणजे आमचे काम झालें.
विदूषक : जोशाचे काम फार सोपे आहे, नाही बरें ? कारण तोंडाने सांगितले पुरे म्हणजे सर्व आयते मिळतें. बाईचा नवरा ः ते तेच सांगा फार महाराज, तुम्हाकडून हरकत असती तर तुम्ही आमच्या घरी टांगा तोडीत येऊन सांगितलेच नसते.
जोशी : सुमारे पाच रुपये पुजेसुद्धा निदान पक्षाला लागतील असे मला वाटते. मग पुढे जसा गूळ घालावा, तसें गोड होईल, पुढे तुमच्या भक्तीवर आहे.
विदूषक : जोशाने पांच रुपयाचा खर्च कुणब्याच्या माथ्यावर थापला, तथापि यापुढें भक्ती आहे म्हणतो कोणती ?