पान:Samagra Phule.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय बाई : तिने तुमच्या संतोषाप्रमाणे दिले असते तर तुम्ही तिचे मूल वाचविले असते काय? जोशी : यात काय संशय आहे? जर तिने मला संतोषविले असते तर खचित मी त्या मुलावरील सर्व पीडा दूर केल्या असत्या आणि ती पुत्रवती झाली नसती काय? विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) -- जोशी आपल्या मुलांस कसे मरू देता हे तुम्ही त्यास विचारा. बाई : तिच्या मुलांवर पीडा तरी कसल्या होत्या त्याविषयी मला काही कळत नाही, तुम्हीच का सांगाना? जोशी : काय तुला ग्रहाच्या पीडा ठाऊक नाहीत काय? अगे जेथे महादेवासारख्या देवाला ज्याचे भय वाटून पाण्यात बुडी मारून लपावे लागले आणि त्यांच्या झपाट्यातून वाचलेत तरी कोण? विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) महादेव भोळा खरा म्हणूनच त्याने जोशींचे ऐकून ग्रहाला भ्याला. बाई : (किंचित भय वाटून म्हणते) तर ते मजला पीडा करीत आहेत काय? जोशी : तुला तर नाही, पण तुझ्या होणाऱ्या मुलाच्या मुळावर फार ते टपले आहेत, माझ्याने सांगवत नाही, त्याचा ते शेवट कसा करतील! विदूषक : जोशी जर मरणापासून माणसे वाचवितात तर, इंग्रज सरकार सर्व औषधी उपाय करण्यास एकीकडे ठेऊन सर्व इस्पितळेही मोडून, ते सर्व काम जोशीच्या गळ्यात का बांधीत नाहीत? बाई : (मोठी घाबरी होऊन, मुठीतली भिक्षा उभ्यानेच सुपात टाकून, हात जोडून, मोठ्या अर्जवाने म्हणाली) महाराज त्यांस काही उपाय असल्यास सांगा! तू वेडी आहेस. त्याजविषयी उपाय कां तुझ्याने होतात; तुझ्या नवऱ्याला येऊन जाऊन, चार टिकल्या मिळणार. विदूषक : जोशांना जर भविष्य कळून सांगता येते, तर करंज्यावर उडी मारून मेलेल्या पेशव्याविषयी सर्व त्यांच्या सरदारास पूर्वी कळवावे म्हणून जोशींचे ज्ञान त्यावेळीस कोठे बंगाल्यांत गेले होते काय? बाई : (नवरा कसचा देतो असे मनांत म्हणून) तुम्ही म्हणतां ते सर्व खरे आहे, पण तुम्ही कृपा करून मला किती खर्च लागेल तो सांगा तर खरें? जोशी : बरें बरें, मला येव्हांतर जाऊ दे. पुढे त्याविषयी पाहता येईल, माझी भिक्षेची वेळ जाती. बाई : (मोठ्या आग्रहाने) असे नका करूं, महाराज मी तुम्हाला तुमच्या भिक्षेपुरते दाणे देते. जोशी: