पान:Samagra Phule.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(बत्तीस) महात्मा फुले : समग्र वाङ्मय यांनी मुद्रणाच्या बाबतीत दाखविलेल्या आपुलकीबद्दल त्यांचेही आभार मानावे तेवढे थोडेच. महात्मा फुले यांच्या जीवनाचा कालपट, त्यांचे हस्ताक्षर, त्यांच्या अद्याप अनुपलब्ध राहिलेल्या वाङ्मयाची माहिती, निवडक संदर्भ सूची आणि शब्दसूची देऊन या ग्रंथाचे संपादन, सर्वसामान्य वाचक आणि विशेष अभ्यासक या उभयतांनाही उपयुक्त व्हावे, असा आम्ही यथाशक्ति प्रयत्न केलेला आहे. ग्रंथसंहिता मूळची ठेविली आहे. अर्थबोधाच्या दृष्टीने अडचण पडू नये म्हणून विरामचिन्हांबाबत मात्र आम्ही स्वातंत्र्य घेतले आहे. क्वचित एखाद दुसरा शब्द चौकटी कंसात देऊन न्यून पूर्ण करून घ्यावे लागले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी यांच्यासारख्यांचे ग्रंथ हे समाजाचे विचारधन आहे, असे मानून ते जनतेला स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाने चालविलेला आहे. जोतीराव फुले यांचे ग्रंथही समाजाचे विचारधन आहे असे मानून पुनर्मुद्रित केल्याबद्दल मराठी जनतेला संतोषच वाटेल. जनताजनार्दनासाठी आरंभिलेल्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होता आले, याविषयी आम्हाला कृतज्ञता आणि कृतार्थता वाटत आहे. धनंजय कीर. स. गं. मालशे.