पान:Samagra Phule.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे प्रस्तुत प्रकल्पाची योजना तयार केली. या समग्र वाङ्मय ग्रंथाची पहिली आवृत्ती स्व. धनंजय कीर व स्व. डॉ. स. गं. मालशे या दोन विद्वानांनी सिद्ध केली. त्यानंतर त्याच्या एकूण तीन आवृत्त्या निघाल्या. वाचकांचा उदंड प्रतिसाद या वाङ्मय प्रकल्पाला लाभला. नंतरच्या आवृत्तीसाठी त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील विद्वान डॉ. य. दि. फडके यांचे संपादन लाभले व त्यांनी आपल्या साक्षेपी वृत्तीने मूळ आवृत्तीमध्ये काही मजकूर नव्याने समाविष्ट केला. डॉ. य. दि. फडके लिहितात त्याप्रमाणे पहिल्या तीन आवृत्तीतील काही उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुधारित चौथ्या आवृत्तीमध्ये काही अस्सल कागदपत्रांचा अंतर्भाव केलेला आहे. त्याचप्रमाणे सुधारित आवृत्तीमध्ये महात्मा फुले यांच्या लेखांची कालक्रमानुसार मांडणी केली आहे. त्यामुळे ही सुधारित पाचवी आवृत्ती सर्व दृष्टीने परिपूर्ण झाली असल्याचे वाचकांना व अभ्यासकांना आढळून येईल. पूर्वीच्या पाच आवृत्त्यांप्रमाणेच या सुधारित व अद्ययावत आवृत्तीलाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, याची मंडळाला खात्री आहे. मुंबई दिनांक : १४ जुलै २००६. (मधु मंगेश कर्णिक) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.