पान:Samagra Phule.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकांचे निवेदन (एकतीस) आपण जन्मलो," ही माहिती खरी असेल, तर त्यांचा जन्मदिन २० फेब्रुवारी १८२८ हा असावा, असे मानता येईल. पुढे मागे कोणा संशोधकास अधिकृत पुरावा मिळाल्यास त्याला दुजोरा मिळेल, म्हणून हे येथे ग्रंथित करून ठेवण्यात येत आहे. परिशिष्ट म्हणून दिलेल्या कालपटात अधिकृत पुराव्याच्या अभावी आम्ही १८२७ हे रूढ जन्मवर्ष गृहीत धरले आहे, या समग्र वाङ्मयातील शिवाजी महाराजांचा पवाडा' जोतीरावांनी ‘परमहंस सभेचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण राणे' यांना अर्पण केलेला आहे. परंतु त्यांचे नाव, राम बाळकृष्ण "जयकर' असे होते. तेव्हा 'राणे' हे आडनाव चुकीने पडलेले दिसते. 'शेतकऱ्याचा असूड' या ग्रंथनामात 'आसूड' असे प्रचलित रूप नाही. याचे कारण त्या ग्रंथाच्या हस्तलिखितावर मोठ्या अक्षरांत ‘असूड' असे शीर्षकवजा लिहिलेले आहे आणि मामा परमानंद यांना लिहिलेल्या पत्रातही तसाच उल्लेख आहे. जोतीराव आपल्या अभंगांना 'अखंड' म्हणून संबोधतात. त्यांची काही पद्यरचना शाहिरी धर्तीची असली, तरी बरीचशी स्फूट रचना मराठी संतपरंपरेतील 'अभंग' वृत्तातच आहे. मात्र मानवता, सद्विवेक, सदाचार, समता यातून सार्वजनिक सत्य सांगणारा आपला वेगळा आशय स्पष्ट व्हावा, म्हणून वेगळीक सुचविणारे 'अखंड' असे अन्वर्थक अभिधान त्यांनी योजिलेले दिसते. जोतीराव फुल्यांच्या समग्र वाङ्मयापैकी काही ग्रंथ पुनर्मुद्रित झालेले असल्यामुळे आम्हाला उपलब्ध होते. तथापि ते मूळ स्वरूपात पुनर्मुद्रित झालेले नव्हते. त्यामुळे शक्यतो त्यांच्या ग्रंथांच्या पहिल्या आवृत्त्या मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कामी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे मराठी संशोधन मंडळ आणि पुणे येथील प्रादेशिक ग्रंथालय यांचे आम्हाला बहुमोल साहाय्य झाले. या उभय संस्थांच्या ग्रंथपालांचे आम्ही आभारी आहोत. महात्मा फुले यांच्या चरित्राची जुळवाजुळव करीत असताना पुष्कळशी सामग्री आणि साधने श्री. धनंजय कीर यांनी कष्टपूर्वक गोळा करून जतन करून ठेवली होती. या साधनां- पैकी काही श्री. पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्यासारख्या थोर जोतीबाभक्ताने पुरविली होती. विशेषतः त्यांच्या साहाय्यविना जोतीरावांच्या अखंडातील अमोल बोल अबोलच राहिले असते. तेव्हा श्री. पंढरीनाथ पाटील यांचे ऋण आम्ही प्रकटपणे मान्य करतो. त्याचबरोबर हा ग्रंथ खराखुरा 'समग्र व्हावा' यासाठी नामदार बाळासाहेब देसाई यांनी दाखविलेली कळकळ आम्ही विसरू शकत नाही. प्रा. गं. बा. सरदार आणि प्रा. राम पटवर्धन यांनी अनुक्रमे 'सत्सार क्रमांक १ (अपूर्ण) आणि' सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजाविधी' या स्वतःपाशी असलेल्या दुर्मिळ पुस्तिका आम्हाला आनंदाने उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचेही ऋणी आहोत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थेचे प्रमुख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनासंबंधी जी प्रथमपासून आस्था दाखविली, तीबद्दल त्यांचे आभार मानणे आमचे कर्तव्यच आहे. मौज मुद्रणालयाचे श्री. विष्णुपंत भागवत आणि त्यांचे सहकारी