पान:Samagra Phule.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(तीस) महात्मा फुले : समग्र वाङ्मय जोतीरावांनी पददलितांची सुखदुःखे आपली मानली. त्यांच्या राहणीशी ते समरस झाले. त्यांनी शेतकरी आणि नापितांचे संप घडवून आणले. त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांच्यात जागृती केली. दलितांमध्ये जातीने जीवन कंठण्यास जाण्याची त्यांची सिद्धता, 'सत्यमेव जयते' हा त्यांचा घोष, अस्पृतेच्या निर्मूलनाचा त्यांनी उचललेला विडा, हातातील काठी, साधे कपडे यांवरून ते काही बाबतीत महात्मा गांधीचे अग्रगामी होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सारांश, जोतीराव हे महारमांगादी अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे पहिले उद्धारक, पाच हजार वर्षांच्या भारताच्या इतिहासात मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय म्हणून भारतीय स्त्रीशिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, शेतकरी नि कामकरी यांच्या दुःखाचे नि दारिद्र्याचे निवारण करण्यासाठी चळवळ उभारणारे पहिले पुढारी आणि चातुर्वर्ण्य आणि जातीभेद या संस्थांवर कडाडून हल्ला चढवून, मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते होते. आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आणि 'सत्यमेव जयते' या दिव्य तेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होत. अशा या नररत्नाचा गौरव म. गांधीनी 'खरा महात्मा' म्हणून करावा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना ‘समाजक्रांतिकारक' म्हणून प्रशंसावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध नि कबीर यांच्याबरोबर त्यांना गुरुत्वाची पदवी अर्पण करावी, यांतच त्यांच्या थोरवीची भव्यता दिसून येते. 'भारतीय समाजक्रांतीचे जनक' आणि 'भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित' असा त्यांचा थोडक्यात पण सार्थ उल्लेख करता येईल. जोतीराव हे एक महान ध्येय आहे, महान स्वप्न आहे. लोकशाही ही मानवी समानतेवर, बंधुतेवर आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर अधिष्ठित असली पाहिजे. जसजसे मानवी समानतेचे तत्त्व भारतीय समाजाच्या अंगी बाणेल, तसतशी भारतीय लोकशाही अभेद्य आणि अभंग होईल. मला जे अधिकार आहेत, ते माझ्या अन्य देशबांधवांनाही असलेच पाहिजेत, असे जेव्हा भारतीय जनपद म्हणू लागेल, तेव्हाच जोतीरावांच्या समग्र ग्रंथात त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले, असे यथार्थपणे म्हणता येईल. काही किरकोळ गोष्टींचे स्पष्टीकरण येथे केले पाहिजे. जोतीराव हे आपले नाव 'जोतीराव' असेच लिहीत, ग्रंथावरही तसेच प्रसिद्ध करीत. त्यांनी 'ज्योतीराव' किंवा 'ज्योतीबा' अशी स्वाक्षरी केल्याचे आढळत नाही. ते मॅट्रिक झाले होते, असा उल्लेख केला जातो. पण तो बरोबर नाही. मॅट्रिकची परीक्षा घेणारे मुंबई विद्यापीठ १८५७ साली स्थापन झाले. जोतीरावांनी १८४८ सालीच विद्यार्जन संपवून आपल्या जीवितकार्याला प्रारंभ केलेला होता. जोतीरावांची जन्मतिथी उपलब्ध नाही. त्यांच्या नातलगांपैकी एक वृद्धा सांगत असे, "जोतीबा म्हणत असत की, शनिवारवाडा जळाला, त्याच्या आदल्या दिवशी