पान:Samagra Phule.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकांचे निवेदन (एकोणतीस) संरक्षक सूचनाही या ग्रंथात अनेक आहेत. या सूचनांतील अनुभवी सूक्ष्मपणा ध्यानात घेतला, म्हणजे जोतीरावांचा पारदर्शक दृष्टीचा पुरेपूर प्रत्यय येतो. सर्वस्वी कंगाल बनलेल्या शेतकऱ्यात असंतोष माजू नये, म्हणून शेतकऱ्याला संरक्षण देण्याच्या दृष्टीने इंग्रज सरकार जे कायदे करीत होते, त्यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा, म्हणून जोतीराव जागरूक असत. तत्कालीन सार्वजनिक सभेसारख्या संस्था आणि प्रागतिक वृत्तपत्रे, एकीकडे शेतकऱ्यांविषयी शाब्दिक सहानुभूती दर्शवीत; पण प्रत्यक्षात मात्र सावकार आणि जमीनदार यांच्या बाजूचेच समर्थन करीत. हार्ट डेव्हीसने पुढे मांडलेल्या 'इन्सॉल्व्हन्सी' विधेयकावर प्रागतिक इंदुप्रकाशने विरोधी टीकाच केली होती. या प्रागतिक म्हणविणाऱ्या मंडळींनाही अशा कायद्यांमधून समाजवादाचे भूत भेडसावीत होते. भारतीय शेतकऱ्याच्या दुःखाला जोतीरावांनी वाचा फोडली. त्यांनी कामगारवर्गाचे दुःखही वेशीवर टांगले. जोतीरावांच्या तालमीत तयार झालेल्या सत्यशोधक समाजाच्या पुढाऱ्यांनीच भारतीय चळवळीस प्रारंभ केला, हे ऐतिहासिक सत्य आहे. सत्यशोधक चळवळ हीच भारतातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली पहिली चळवळ होती, हेही सत्य इतिहासाला नमूद करावे लागेल. ही चळवळ म्हणजे खेडुतांना शिक्षण नि ज्ञान देऊन, त्याच्या ठायी वसत असलेली अज्ञानाची नि पूर्वग्रहांची जळमटे झटकून टाकून, आधुनिक संस्कृतीचे आणि ज्ञानाचे लोण त्यांच्यापर्यंत पोहोचविणारी एक सामाजिक प्रबोधिनी होती. जोतीरावांच्या काळी सत्यशोधक चळवळीला ब्राह्मणेतर चळवळीचे स्वरूप नव्हते. जोतीरावांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केला नाही. शासनसंस्था, आर्थिक व्यवहारांची साधने, सामाजिक आणि धार्मिक सत्ता ही सर्व ब्राह्मणांच्या हाती असल्यामुळे त्या चळवळीचे स्वरूप वरवर पाहता ब्राह्मणेतरी आहे असे दिसे. जोतीरावांच्या काळानंतर अनेक वर्षांनी त्या चळवळीला ब्राह्मणेतर चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. जोतीरावांची भाषा रांगडी आणि तिखट आहे. पल्लेदार आणि गुंतागुंतीची वाक्ये लीलेने पेलीत आणि जळजळीत विशेषणांचे चमकारे ओढीत ती घोडदौड करीत पुढे जाते. त्यांच्या कार्याच्या क्रांतिकारकत्वाची आणि लेखणीच्या बोचक धारदारपणाची प्रतिक्रिया आपणास निबंधमालाकारांच्या त्यांच्यावरच्या टीकेत पाहायला सापडते. मालाकारांच्या लेखणीचे कर्तृत्व आणि स्फूर्तिदायकत्व अजोड होते. त्यामुळे त्यांच्या जोतीरावांवरील टीकेचीच छाप काही काळपर्यंत महाराष्ट्राच्या मनावर बसलेली होती आणि साहजिकच जोतीरावांच्या कार्याविषयीचे गैरसमज वाढीस लागलेले होते. परंतु मालाकारांच्या विचारसरणीत सामाजिक दृष्टिकोणाचा आणि मानवी मूल्यांचा अभाव होता, ही गोष्ट आता उघड झालेली आहे. मालाकारांवर जोतीरावांनी फारसे काही लिहिलेले नाही, त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी जो एकमेव उल्लेख जोतीरावांच्या लेखनात येतो, तो त्यांना भलेपणा देणाराच आहे, ही गोष्ट येथे स्पष्ट केली पाहिजे.