पान:Samagra Phule.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(अट्ठावीस) महात्मा फुले : समग्र वाङ्मय 'रे मार्केट' असे तत्कालीन राज्यपालांचे नाव देण्यात आले होते. तरीसुद्धा त्या इमारतीस असलेला जोतीरावांचा सक्त विरोध थांबला नाही, त्यामुळे ब्रिटिश अधिकारी त्यांच्यावर रुष्ट व्हायचे, ते झालेच. तेव्हा निस्पृहता आणि निर्भयता हे त्याच्या अंगचे गुण ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बाबतीत कसे अबाधित होते, याची साक्ष पटल्यावाचून राहत नाही. ड्यूक ऑफ कनॉट यांच्या सत्कारप्रसंगी त्यांनी केलेले भाषण संस्मरणीय आहे. “आपल्यासमोर रेशमी कापडे नि अलंकार परिधान केलेले श्रीमंत, सरदार नि जहागिरदार पाहून रयतेविषयी आपण मत बनवू नये. खरा हिंदुस्थान पहावयाचा असेल, तर मजबरोबर खेड्यांत चला, असे त्यांनी युवराजांना स्पष्टपणे सांगितले. जोतीरावांनी जातिसंस्था, परंपरागत रूढी, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक विषमता यांविरुद्धच कार्य केले, असे नाही; तर शिक्षणक्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. हंटर शिक्षण आयोगाला त्यांनी जे निवेदन सादर केले त्यात त्यांची शैक्षणिक मते स्पष्ट झालेली आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे, ही मागणी करणारे जोतीराव हे पहिले भारतीय होत. प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनात वाढ करावी, कनिष्ठ वर्गीयातील शिक्षक तयार करावे, खेड्यातील मुलांना शेतकीचे आणि तांत्रिक शिक्षण द्यावे, शेतकीच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी 'आदर्श शेता'ची योजना आखावी अशा मौलिक सूचना या निवेदनात त्यांनी केलेल्या आहेत. आपल्या राष्ट्राच्या भाषेचा प्रश्नही त्यांच्या दूरदृष्टीतून सुटलेला नव्हता. मातृभाषा (मराठी), हिंदी आणि इंग्रजी, असा त्रिभाषासूत्राचाच तोडगा त्यांनी सुचविलेला होता. 'शेतकऱ्यांचा असूड' हा जोतीरावांचा ग्रंथ अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या अवनतस्थितीचे विदारक चित्र रेखाटून त्या अवनतस्थितीची मूलगामी मीमांसा केली आहे. आणि ती सुधारण्यासाठी सर्वांगीण उपाययोजनाही सुचविली आहे. जमिनीची सुधारणा कशी करावी, धरणे, पाटबंधारे कोठे बांधावे, गुरांची उत्तम निपज कशी करावी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी काय करावे, शांततेच्या काळात शेतीसुधारणेच्या विधायक कार्यासाठी सैनिकांचा उपयोग कसा करता येईल, अन्य सुधारलेल्या राष्ट्रांत शेती कशी केली जाते, याचे शिक्षण देऊन भारतीय शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशांत पाठवून आणणे कसे अगत्याचे आहे, शेतकीची वार्षिक प्रदर्शने भरवून उत्तम पीक काढणाऱ्या शेतकऱ्यास पारितोषिके देणे कसे उपायकारक ठरणारे आहे, यांसारख्या विधायक सूचनांबरोबर शेतातून चोऱ्या झाल्यास पोलिसांना दंड का केला पाहिजे, वाढीदिढी करणाऱ्या सावकार-व्यापाऱ्यांवर करडी नजर कशी ठेवली पाहिजे, ब्रिटिश भांडवलदारांचे अवाच्या सव्वा व्याज का बंद केले पाहिजे, शेतीस अवश्य असलेल्या पशुधनाच्या रक्षणासाठी गोवधबंदी कशी आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या मुलांचा नैतिक अधःपात होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत अशांसारख्या