पान:Samagra Phule.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकांचे निवेदन (सत्तावीस) जातिभेदाबाबत त्यांची भूमिका सडेतोड होती, उच्च वर्णीय सुधारक या प्रश्नाला प्रायः बगल देत, वा त्याची उपेक्षा करीत. जोतीरावांची अशी भूमिकाच होती की, जातिभेदाचे निर्मूलन झाल्याशिवाय तत्कालीन राष्ट्रसभेने पुढे ठेवलेले एकराष्ट्रीयत्वाचे (OneNation) ध्येय प्रत्यक्षात उतरणे सुतराम अशक्य आहे. जो आपल्या धर्मबांधवांना आणि देशबांधवांना समान मानीत नाही, तो देशभक्त कसला, असा त्यांचा मूलभूत सवाल होता. भारतात कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी त्यांनीच प्रथम टाहो फोडला. स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाची सुधारलेल्या इंग्रजी राज्यांतही परवड होत आहे, हे त्यांनीच प्रथम मांडले. शिक्षण हे वरिष्ठ वर्गातून झिरपत झिरपत कनिष्ठ वर्गापर्यंत पोहोचेल, या तत्त्वाला त्यांचा विरोध होता. तसेच स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, 'गुरूणां माता गरीयसी', या वचनाची थोरवी त्यांना पटलेली होती. भारतीय परंपरेने स्त्री-शूद्रांना एकाच दावणीत बांधून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले होते, त्यांना अज्ञानांधकारात पिचत ठेवले होते. जोतीरावांनी भारतीय स्त्री-शूद्रांस शिक्षणाचे दरवाजे खुले व्हावे, म्हणून सर्वप्रथम जिवाचे रान केले. स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत जोतीरावांनी जे युगप्रवर्तक कार्य केले, त्याविषयी तत्कालीन परकी सरकारनेही त्यांचा सत्कार केला. हे त्यांनी १८५२ साली केले, हे येथे ध्यानात घेणे अवश्य आहे. तेव्हा न्या. रानडे हे केवळ दहा वर्षांचे होते. सामाजिक धारणेचे कैवारी गोपाळ गणेश आगरकर आणि स्त्रियांच्या विद्यापीठाचे संस्थापक धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या अबलोन्नतीसाठी पुढील काळात झटलेल्या सुधारकांचा तेव्हा जन्मही झालेला नव्हता. उभ्या भारतात स्त्री-शूद्रांच्या उद्धारकार्याचा श्रीगणेशा जोतीरावांनीच केला. समाज सुधारणेचा असा हा गजर प्रथम महाराष्ट्रात झाला. त्यांच्या या कार्यारंभाने महाराष्ट्रात नवयुगाची सुप्रभात झाली; एवढेच नव्हे, तर त्यातूनच भारतीय समाजक्रांतीला प्रारंभ झाला, असे म्हणणे भाग आहे. शूद्रातिशूद्रांवर विद्या शिकण्याबाबत जी आटोकाट बंदी शतकानुशतके घालण्यात आलेली होती, ती त्यांच्या दुरवस्थेचे आदिकारण होय, असे जोतीरावांचे विचारपूर्वक बनलेले मत होते. इंग्रजी राज्यामुळे या शतकानुशतकाच्या अन्यायाचे परिमार्जन होण्याची संधी प्राप्त झाली होती. पूर्वीच्या सामाजिक चौकटीत ज्या प्रकारची धार्मिक पिळवणूक, सामाजिक विषमता नि अन्याय ही अंगभूत होती, तशी ती नव्या राजवटीत नव्हती. नव्या राजवटीत समानसंधीला वाव होता, शूद्रातिशूद्रांना स्वतःची उन्नती करून घेण्याची आशा निर्माण झाली होती. त्यामुळे इंग्रजी राज्याविषयीची कृतज्ञता त्यांनी अनेकदा व्यक्त केलेली आहे. मात्र त्यावरून जोतीराव हे इंग्रजधार्जिणे होते, असे मुळीच म्हणता येणार नाही. ब्रिटिश राज्य आज ना उद्या जाणार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हणून ठेवले आहे. ब्रिटिश महाराज्यपालाच्या भेटीप्रीत्यर्थ पुणे नगरपालिकेने खर्च करू नये, असे विरोधी मत, एकंदर बत्तीस सभासदांपैकी एकट्या जोतीरावांनीच व्यक्त केलेले होते. मंडईच्या नव्या इमारतीस