पान:Samagra Phule.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(सव्वीस) महात्मा फुले : समग्र वाङ्मय 'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा जोतीरावांचा ग्रंथ त्यांच्या 'मानवविषयक संकल्पनेचे' (Concept of Man) समग्र दर्शन घडवितो. हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा एक एक जाहीरनामाच आहे, जणू विश्वकुटुंबवादाची ती एक गाथाच आहे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रेरणेस नि बुद्धीस योग्य वाटेल तो धर्म स्वीकारून गुण्यागोविंदाने नांदावे, असे उपदेशिणारी विशाल धर्मसहिष्णुतेची ती जणू नवगीताच आहे! धार्मिक सहिष्णुता, मानवी प्रतिष्ठा आणि मानवी समानता ही मूल्ये या ग्रंथाची मूलाधारप्रेरणा आहे. मानव हीच सामाजिक मूल्यांची आणि समाजधारणेची मापकाठी असावी, हा विचार त्यात प्राणभूत आहे. सर्व भूखंडावरील लोकांनी एकजुटीने, एकमताने, सर्वांचे सारखे हक्क मान्य करून, देशभिमान आणि धर्माभिमान, यांच्या पलीकडे पाहावे, ही या ग्रथांची प्रमुख शिकवण आहे. हा ग्रंथ अनेक विधायक सूचनांनी ओतप्रोत भरलेला आहे 'गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून जोतीरावांनी जुन्या समाजरचनेवर, जुन्या अवतारकल्पनांवर, जुन्या मूल्यांवर घणाघाती हल्ला चढविला आणि सत्यशोधक चळवळीचा पाया घातला, तर 'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' लिहून त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानमंदिरावर विधायक स्वरूपाचा कळस चढविला. जोतीरावांनी त्या विषम काळात अस्पृश्यांचे दुःख ज्या आत्मीयतेने वेशीवर टांगले, ती आत्मीयता खरोखर असामान्य म्हटली पाहिजे. जोतीराव हे अस्पृश्य वर्गापैकी नव्हते. ते माळी समाजातले होते. त्या काळच्या मानाने त्यांचे शिक्षणही व्यवस्थित झालेले होते. चार लब्धप्रतिष्ठितांप्रमाणे लोकक्षोभाला भिऊन त्यांनी मध्यमक्रम स्वीकारला असता, तर समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. पण शतकानुशतके माणुसकीला पारख्या झालेल्या समाजाविषयीची त्यांची करुणा जातिवंत होती. अस्पृश्यांना आणि अन्य पददलितांना ते आपल्या कुटुंबातलेच, आपल्या रक्तामांसाचे मानीत. जातिभेद आणि चातुर्वर्ण्य या संस्था त्यांना सर्वस्वी अमान्य होत्या. त्यामुळे अस्पृश्यांची अस्पृश्यता काढून टाकून, त्यांना पंचम वर्ग म्हणावे, की दुसरे काही नाव द्यावे, असा पर्याय वा पळवाट त्यांच्या समानतेच्या तत्त्वज्ञानात बसण्यासारखी नव्हती. जोतीरावांनी अंगीकारलेल्या कित्येक सुधारणा आज समाजाने स्वीकारल्या आहेत. स्त्रीशिक्षणाविषयी आता मतभेद राहिलेले नाहीत. पतित स्त्रियांचा उद्धार आणि अनाथ अर्भकांचे संवर्धन यांविषयी त्यांनी घालून दिलेला आदर्श आज समाजाने पचवून टाकलेला आहे. केशवपनाचा प्रश्न आज गतार्थ झाला आहे. पण त्या काळी त्यांना नापितांकडून केशवपनाविरुद्ध बंड करवावे लागले नि त्याचे पडसाद लंडनमध्येही उमटले. विधवाविवाहाला उत्साहाने उत्तेजन देताना त्यांना लोकनिंदा सहन करावी लागली. त्या काळच्या सुशिक्षित सुधारकांना जोतीरावांचा पाठिंबा असे. पण कृतीची वेळ येताच बहुतेक प्रसंगी ते लोक कचखाऊ ठरत, म्हणून त्यांच्याविरुद्ध जोतीरावांचा विशेष कटाक्ष दिसतो.