पान:Samagra Phule.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकांचे निवेदन (पंचवीस) असा प्रश्न करून “सत्यावीण नाही अन्य धर्म", "मानवांचा धर्म । सत्यनीती हीच", असे खऱ्या धर्माचे रहस्य त्यांनी उपदेशिले. त्यांची ही धर्मातीत विचारसरणी त्यांच्या काळात खरोखर अशक्य कोटीतली होती. देवाला त्यांनी निर्मीक' म्हटलेले आहे, ते त्याला अन्य कोणत्याही नावाने संबोधित नाहीत. विश्व अनंत आहे, ते अथांग आहे, विश्वाच्या आणि देवाच्या शोधामागे लागून मानवाने आपले आयुष्य व्यर्थ घालवू नये, हे बरे, असे त्यांचे सांगणे आहे. कोठे आहे स्वर्ग । पाहिले ते कोणी । भिऊ नका मनीं । । असा त्यांनी सामान्य माणसाला धीर दिला आहे. जपानुष्ठानाने पाऊस पडत नाही, मंत्राने अपत्यप्राप्ती होत नाही, देवाला कोणी पाहिलेले नाही, त्याला नारळ, कोंबडी, बकरी यांच्या नैवेद्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. अवतारकल्पना, आत्मसाक्षात्कार, दैवी चमत्कार या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. देव म्हणजे कोणी अद्भुत, कोणी अदृश्य विभूती नव्हे, आपण राहतो, ती सृष्टी निसर्गाच्या नियमांनी बांधलेली आहे, देव ही एक निर्गुण निराकार अशी विश्वाची शक्ती आहे, असेच त्यांनी मानले आहे. भौतिकवाद्यांना आणि समाजवाद्यांनाही पटावे, असे हे जोतीरावांचे तत्त्वज्ञान आहे. मात्र जोतीरावांच्या तत्त्वज्ञानांत सामाजिक नीतिमत्तेवर मुख्य भर आहे, हे विसरून चालणार नाही. किंबहुना नीती हाच मुळी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. धर्माच्या नावावर चालत आलेल्या रूढींची नीतीशी झालेली फारकत हिंदू धर्माने खपवून घेतलेली होती, त्याची त्यांना मनस्वी चीड होती. अनीतिमान ब्राह्मणांवर त्यांनी जितक्या कठोरपणे कोरडे ओढले आहेत, तितक्याच कठोरतेने अनीतिमान ब्राह्मणेतरांनाही धारेवर धरले आहे. मद्यपानाच्या अनिष्ट प्रचाराला आळा घालावा, म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. थोडे दिन तरी मद्य वर्ज करा । तोच पैसा भरा । ग्रंथासाठी ।। ग्रंथ वाचताना मनीं शोध करा । देऊ नका थारा । वैरभावा । असे त्यांनी आवर्जून सांगितले अहे. चांगल्या कार्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, हे साधनशुचितेचे त्यांनी घातलेले बंधन त्यांच्या मूलग्राही नैतिक अधिष्ठानाचे निदर्शक आहे. ख्रिस्तधर्मी आपला पवित्र ग्रंथ जगात कोठेही वाचू शकतात; मुसलमान आपले कुराण कोठेही वाचू शकतात; मग ब्राह्मणांनी आपला वेद आणि मनुसंहिता का लपवावी, असा मूलभूत प्रश्न त्यांनी विचारला आहे. या बिनतोड प्रश्नाने शूद्रातिशूद्रांनी हिंदू धर्मग्रंथ वाचू नयेत, असे म्हणणे किती अन्यायाचे आहे, हे तर दिसतेच, तर त्याचबरोबर त्या लपवाछपवीतच या धर्माची गोम आहे, हेही उघड होते आणि जोतीरावांच्या टीकेची यथार्थता पटते. एच-२२