पान:Samagra Phule.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(चोवीस) महात्मा फुले : समग्र वाङ्मय विचारवंत पुढे सरसावले, त्यांत जोतीरावांना अग्रमान देणे क्रमप्राप्तच आहे. टॉमस पेन या महान बंडखोर विचारवंताच्या 'मानवाचे हक्क' (Rights of Man) या ग्रंथाचा फार मोठा परिणाम जोतीरावांच्या मनावर विद्यार्थिदशेतच झाला आणि त्यातून त्यांच्या जीवितकार्याची दिशाच ठरल्यासारखी झाली. त्यांनी आपले सर्व जीवित मानवी स्वातंत्र्यासाठी समर्पित केले, त्यासाठी अविरत त्याग केला, लोकक्षोभाला जुमानले नाही, संकटांना धैर्याने तोंड दिले, अक्षरक्षः दिव्य केले! समाजात, शब्दप्रामाण्य, जुने आचारविचार, जुन्या रूढी, कर्मकांड, जपजाप्य, पूर्वसंचित, पूर्वजन्म, ईश्वरी संकेत, स्वर्ग-नरक इत्यादी कल्पना प्रसृत करणाऱ्या आणि मानवी कर्तृत्व दास्यशृंखलांत बद्ध करून टाकणाऱ्या भोळ्या समजुतींवर जोतीरावांना सतत आघात करावे लागत होते. थंड गोळ्यासारखा पडलेला बहुजनसमाज जोवर हालत नव्हता, तोवर त्यांना पुन्हापुन्हा कंठरवाने तेच तेच सांगावे लागत होते. “ती ती पदे नित्य फिरून येती । त्या त्याच अर्थाप्रति दाविताती' हे हाडाच्या प्रचारकाला चुकत नाही. जोतीरावांच्या वाङ्मयातील पुनरुक्तीचे हे एक मर्म ध्यानात ठेवावयास पाहिजे. हे मर्म ध्यानात ठेवून सारग्रहण करणाराला त्यांच्या वाङ्मयात मूलगामी विचारांचा ठेवाच हाती लागल्यासारखे वाटेल. निर्मीके निर्मीला मानव पवित्र । कमीजास्त सूत्र । बुद्धीमध्ये ।। पिढीजादा बुद्धी नाही सर्वांमधीं । शोध करा आधीं । पुर्तेपणीं ॥ असा त्यांचा दृढ विश्वास होता नि तो त्यांनी वारंवार प्रकट केलेला आहे. मनुष्य जन्माने, जातीने वा धनाने श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नसून, तो आपल्या कर्माने श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत असतो, तो स्वतःच आपल्या भाग्याचा नियंता आहे, अशी त्यांची धारणा होती. तद्नुसार त्यांनी जातिसंस्थेविरुद्ध बंड पुकारले आणि बुद्धिप्रामाण्य, समता नि मानवता यांवर अधिष्ठित अशा सामाजिक पुनर्रचनेचे निशाण फडकावले. कोणताही धर्म ईश्वरप्रणीत नाही, कोणताही धर्मग्रंथ देवनिर्मित नाही, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी निर्मिलेली धर्मपुस्तके आहेत, त्यापैकी एकाही पुस्तकात आरंभापासून शेवटपर्यंत सार्वजनिक सत्य नाही, चातुर्वर्ण्य वा जातिभेद या संस्था देवनिर्मित नाहीत, त्या मनुष्यनिर्मित आहेत, ही सत्ये त्यांनी त्या काळी मोठ्या धैर्याने पुढे मांडली. धर्म राज्य भेद मानवा नसावे । सत्याने वागावें । ईशासाठीं ।। ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी । धरावे पोटाशीं । बंधुपरी ॥ निर्मीकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक । कशासाठी? |