पान:Samagra Phule.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रथम आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन मराठी जनतेच्या इच्छेला मान देऊन महाराष्ट्र शासनाचे साहित्य आणि संस्कृती मंडळ महात्मा जोतीराव फुले यांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करीत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. जोतीरावांच्या काळी ब्रिटिशांची राजवट चालू होती. त्या राजवटीत अधिकारावर असलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी त्यांच्या वाङ्मयाविषयी कोणत्याही त-हेची, रेसभरसुद्धा सहानुभूती दाखविली नाही; उलटपक्षी त्यांची उपेक्षा करता करता जेव्हा कधी उल्लेख केला, तेव्हा त्यावर कुत्सित टीकाच केली. तथापि, स्वतंत्र भारतामधील महाराष्ट्र शासनाने, धर्मातीत लोकशाहीच्या या अग्रदूताच्या विचारप्रवर्तक, बुद्धिवादी आणि क्रांतिप्रवण तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवावे, म्हणून त्यांच्या वाङ्मयाचे पुनर्मुद्रण करण्याचे ठरविले, ही ऐतिहासिकदृष्ट्या मोठी उचित अशी घटना घडलेली आहे. जोतीरावांचे वाङ्मय वाचताना विचारवंत वाचकांनी, त्यांचा कालखंड आणि त्यातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे भान राखणे हे जसे आवश्यक आहे, तद्वतच वाङ्मयीन टीकाकारांनी त्यांच्या वाङ्मयातील अभिव्यक्तीच्या बहिरंगाकडे न पाहता, त्यातील आशयाच्या अंतरंगाकडे पाहणे आवश्यक आहे. जोतीराव हे कोणी साहित्याचार्य नव्हते, ते भाषाशास्त्रज्ञ नव्हते, इतिहासकार नव्हते की मोठे धर्मवेत्तेही नव्हते. ते होते कृतिशील तत्त्वचिंतक! प्रत्येक शतकात न्याय, नीती आणि मानवता या शाश्वत तत्त्वांची जाणीव करून देऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा मार्ग दाखविणारे जे मूलाधार असे महापुरुष अवतरत असतात, त्यांपैकी जोतीराव एक होते. त्यांच्या शेतकरी भट्टीच्या मुशीतून ज्या तप्त स्वरूपात भाषा बाहेर पडली, त्या स्वरूपातच ती ग्रंथामधून प्रसिद्ध झालेली आहे. ब्रिटिश राजसत्तेबरोबर भारतात आलेले नवे ज्ञान, बुद्धिवाद, यंत्रयुग आणि विज्ञान यांच्या प्रकाशात ब्राह्मणी धर्माची, जुन्या पोथ्यापुराणांची, जुन्या धर्मग्रंथांची आणि त्यांनी घडविलेल्या सामाजिक मूल्यांची परीक्षा करण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास जे