पान:Samagra Phule.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(वीस) महात्मा फुले : समग्र वाङ्मय पडतात. प्राथमिक व मध्ययुगीन सर्व मानवसमाजांच्या धार्मिक चालीरीती, मंत्रतंत्र, जादूटोणा इत्यादी व्यवहारांचा 'टाबू' व 'माना' या कल्पनांच्या साहाय्याने मानवजातिशास्त्रज्ञांना करता येतो. 'टाबू' म्हणजे निषिद्ध पापशक्ती व 'माना' म्हणजे विधायक पुण्यशक्ती होय. उदा. गोमांस भक्षण हे महापाप मानणे, मृतांच्या नातेवाईकांना अस्पृश्य मानणे म्हणजे सुतक पाळणे, प्रेताला अपवित्र मानणे, डुकरांचे मांस निषिद्ध मानणे इत्यादी प्रकारच्या निषेधात्मक चालीरीती आर्य व आर्येतर या सर्वांच्याच मध्ये पडतात. गोमांस भक्षण हे पाप आहे ही कल्पना मूळची आर्यांची नव्हे. ती आर्येतरांची आहे व ती कालांतराने आर्यांनी स्वीकारली ही कल्पना जोतीरावांनाही मान्य झाली असती; हे वैदिक आर्य गोमांसभक्षक होते असे त्यांनी वारंवार केलेल्या विधानांवरून स्पष्ट होते. मृतांच्या नातेवाईकांची अस्पृश्यता म्हणजे सुतक पाळण्याची चाल ही आर्येतरांपासून आर्यांनी स्वीकारली ही गोष्ट स्मृतीवरून अनुमानता येते. शूद्रांनी सुतक एक महिना पाळावे असे विधान स्मृतींत आढळते. स्मृतींमध्ये भक्ष्याभक्ष्यविषयक किंवा स्पृश्यास्पृश्यविषयक सांगितलेल्या चालीरीती या परंपरागत असलेल्या त्या त्या जमातींच्या चालीरीती होत, नव्या कायद्याने निर्माण केलेल्या चालीरीती नव्हेत, ही गोष्ट स्मृतीच्या आधुनिक अभ्यासकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. बऱ्याचशा अनुयायांना व चाहत्यांना न मानवणारे असे अनेक मौलिक विचार जोतीरावांना मांडले आहेत. उदा. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी व अन्य संतप्रणीत ग्रंथ शूद्र अतिशूद्रांना फसविण्याकरिता व ब्राह्मणांचे अधिपत्य दृढ करण्याकरिता निर्माण केलेले कारस्थान आहे असे जोतीराव अनेक ठिकाणी बजावतात. विष्णू व पंढरीचा विठ्ठल यांची जोतीरावांनी खूप थट्टा उडविली आहे हे महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना व अनुयायांना कितपत पचले असेल याची वानवा आहे. हिंदू धर्मातील मूर्तीपूजा हे ब्राह्मणांनी पोट भरण्याकरिता काढलेले थोतांड आहे, तीर्थयात्रा, श्राद्ध इत्यादी विधी हा लबाडपणा धंदा आहे, एकेश्वरवादी ख्रिस्ती धर्म व मुसलमान धर्म हे हिंदू धर्मापेक्षा अधिक श्रेष्ठ धर्म आहेत इत्यादी जोतीरावांची विधाने चाहत्यांनी व अनुयायांनी मनन करण्यासारखी आहेत. महंमदावर एक उत्कृष्ट प्रशंसापर कविता जोतीरावांनी लिहिली आहे. ती या संदर्भात वाचावी. ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी येथील हिंदूना बाटविण्याचे पूर्वी केलेले प्रयत्न जोतीरावास स्वागतार्ह वाटतात. त्याबद्दलची पोटदुखी केवळ ऐतखाऊ ब्राह्मणांनाच बाधते, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. उदा. पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्म पत्करून केलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसाराची जोतीरावांनी प्रशंसा केली आहे. (सत्सार) मात्र याचा अर्थ असा नव्हे की हिंदूंनी मुसलमान वा ख्रिस्ती व्हावे असे जोतीरावांचे मत होते. पवित्र ग्रंथनिष्ठ सर्वच धर्म हे मानवामानवात फूट पाडणारे असल्यामुळे अयोग्य होत, असा त्यांचा अंतिम निर्णय होता. तुलनात्मक दृष्टीने विचार करता, प्रचलित हिंदू धर्मापेक्षा मुसलमान वा ख्रिश्चन धर्म कैक पटीने श्रेष्ठ होत एवढेच त्यांना सांगावयाचे होते. खरा धर्म सर्व मानवांचा एकच