पान:Samagra Phule.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना (एकवीस) आहे. सर्व धर्मनिष्ठ सामाजिक भेद हे मिथ्या भेद होत, असा त्यांनी काढलेला अंतिम निष्कर्ष होता. हिंदू धर्मावरील विशेषतः ब्राह्मणप्रधान हिंदू समाजरचनेवरील व ब्राह्मणप्रधान संस्कृतीवरील त्यांचा हल्ला एका तत्कालीन ऐतिहासिक विशिष्ट सामाजिक व राजकीय परिस्थितीची तीव्र प्रतिक्रिया होती व ती तीव्र प्रतिक्रिया तटस्थ रीतीने पाहणाऱ्या आधुनिक विचारवंतास मर्यादित अर्थाने समर्थनीयच वाटेल यात शंका नाही व ती समर्थनीय आहेच. अव्यवस्थित व बेजबाबदार उत्तर पेशवाईत व अव्वल इंग्रजीमध्ये ब्राह्मणांचे महाराष्ट्रात प्रस्थ वाढले व सामाजिक विषमतेची धार अधिक तीक्ष्ण झाली ही गोष्ट लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, आगरकर इत्यादी आधुनिक विचारवंतांनादेखील खंत व उद्वेग उत्पन्न करणारी होती ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. उत्तर पेशवाई बेजबाबदार व हीन दर्जाची होती असेच लोकमान्य टिळकांचेही मत होते. लोकहितवादींची शतपत्रेही या गोष्टीची साक्ष देतात. ही शतपत्रे म्हणजे ब्राह्मणी विद्यांवर व ब्राह्मणी संस्कृतीवर उगारलेली बुद्धिवादी शतशस्त्रेच होत. ती अजूनपर्यंत गंजलेली नाहीत. त्यांचे तेज अजूनही तळपत आहे. वर्तमान परंपरावादी विद्यापीठीय अनेक सुशिक्षतांना, विशेषतः मराठी प्राध्यापकांना, त्यांच्यापासून मिळणारा इशारा अजूनही लक्षात आलेला नाही. परंतु आता स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मणेत्तर वाद हा जीर्ण झाला असून त्यातील अभिनिवेश जर कायम राहिला, तर तो अधोगतीचे एक लक्षण ठरेल, याची दखल आधुनिक लोकशाही शक्तींनी स्पष्टपणे घेतली पाहिजे. ज्या परांपरागत संस्कृतीवर जोतीरावांनी हल्ला केला त्या लोकसंस्कृतीचेच एक प्रत्यंतर म्हणजे लोकशाही भारतातील ब्राह्मणेतर वाद व जातिवाद होय. जोतीराव हा ब्राह्मण जमातीवर जितका कडाडून हल्ला करीत तितकेच उलट अंतरंगातून अत्यंत मऊ आहेत हेही त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनावरून दिसून येते. ज्या ज्या ब्राह्मणांनी सहकार्य वा अल्पस्वरूप वा मोठी मदत सत्यशोधक समाजास केली तिची पावती अत्यंत नम्रपणे व प्रेमळ बंधुत्वाने त्यांनी दिलेली आहे ही गोष्ट या 'महात्मा फुले : समग्र वाङ्मय' संग्रहात अनेक ठिकाणी दिसून येईल. त्यांचा हल्ला पद्धतीवर होता, विशिष्ट जातीतील माणसांवर नव्हता. हा विवेक त्यांच्या हृदयात सतत जागृत होता. हा विवेक त्यांच्या चाहत्यांमध्ये जर जागृत राहिला तर आगामी यादवी टाळण्याचे श्रेय पदरात पडू शकेल. श्री. धनंजय कीर व डॉ.स. गं. मालशे यांनी साक्षेपाने हा संग्रह संपादित केला, याबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ त्यांचे मनःपूर्वक आभारी आहे. वाई, मकर संक्रमण, दिनांक १४ जानेवारी १९६९. लक्ष्मणशास्त्री जोशी.