पान:Samagra Phule.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना (एकोणीस) टिपण्यांवरून उघडकीस येते. इंग्रजी शिक्षण बेताबेताचे होते. तरी इंग्लिश लिहू शकत होते व महत्त्वाचे उच्च दर्जाचे ग्रंथ समजून वाचू शकत होते ही गोष्टही यावरून निदर्शनास येते. अलीकडे, गेल्या शंभर वर्षांत, प्राचीन भारतीय इतिहासाचे जे मौलिक संशोधन झाले आहे त्या संशोधनाचे पूर्वीच्या संशोधकाचे बरेचसे निर्णय काही बाबतीत चुकीचे ठरले आहेत व काही बाबतीत अंशतः काल्पनिक ठरले आहेत. मत्स्यावतारापासून परशुराम अवतारापर्यंतच्या अवतारांचा जोतीरावांनी केलेला ऐतिहासिक अर्थ वामन व परशुराम वगळल्यास केवळ काल्पनिक आहे असे मानावे लागते. विशेषतः भारतीय विषम व ब्राह्मणप्रधान समाजरचनेस बाहेरून आलेले ऋग्वेदिक आर्य हे मूलतःच कारण होत या विधानाला आता विशेष पुष्टी मिळू शकत नाही. ऋग्वेदिक आर्य संख्येने अत्यल्प होते व कायम पगडा बसवितील इतके बलवानही नव्हते. विषम समाजरचनेची निर्मिती ही समाजाच्या आंतरिक सामाजिक शक्तींच्या आर्थिक व राजकीय बलामुळे निर्माण होत असते व ती परिवर्तन पावत असते हा सामाजिक विकासाचा सिद्धान्त मान्य करावा लागतो. आर्यपूर्व अवैदिक भारत हा विकसित अशा द्राविडी संस्कृतीने व्यापला होता व वर्तमान हिंदू धर्म हा त्याच संस्कृतीचा परिवर्तित आविष्कार आहे ही उपपत्ती आता सर्वमान्य झाली आहे. काही विद्यमान आधुनिक संस्कृतिशास्त्रज्ञ तर जातिभेद हा आर्यपूर्व संस्कृतीत भारताच्या दक्षिण प्रदेशाला वाढीस लागला व तो वैदिक आर्यांना स्वीकारावा लागला असेही म्हणू लागले आहेत. जोतीरावांनी 'गुलामगिरी' या पुस्तकात दाखविलेल्या आर्यपूर्व जोतीबा, खंडोबा, म्हसोबा, बहिरोबा, बाणासुर इत्यादी देवता व त्यांचे पूजासंप्रदाय हे आर्यपूर्व लोकांचे होते हे जोतीरावांनी स्वतःच सांगितले आहे. येथील द्राविडी संस्कृतीला आसुरी संस्कृती असे म्हणता येते ही गोष्ट जोतीरावांनीही सुचविली आहे व त्यात बरेच तथ्य आहे. त्याच संस्कृतीतील मोठा व मूळचा पुरोहितवर्ग हाच विद्यमान भारतातील बहुसंख्य ब्राह्मणवर्ग ही गोष्टही जोतीरावांना मान्य झाली असती असे सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकाच्या टिपणीवरून लक्षात येते. येथील देशस्थ ब्राह्मण शूद्र व अतिशूद्र यांच्यापैकीच आर्षीकरण झालेले ब्राह्मण होत असे जे त्यांनी विधान केले आहे त्यावरून सूचित होते. सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनेवर जोतीरावांनी कडाडून हल्ला केला आहे व सोवळ्या-ओवळ्याची ही कल्पना आर्यांनी वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता आर्येतरांवर लादली व ती त्यांनी भुलून पत्करली असे जे जोतीरावांनी जागोजागी विधान केले आहे ते आधुनिक मानवजातिशास्त्रज्ञांना मान्य नाही. सोवळ्या-ओवळ्याची कल्पना प्राथमिक मानवसमाजामध्ये जगात सर्वत्र होती व वर्तमानकालापर्यंत कमी-जास्त प्रमाणात अद्ययावत किंवा आधुनिक पश्चिमी समाज सोडल्यास सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात आहे हे शास्त्रज्ञांच्या गेल्या दीडशे वर्षांतील जागतिक संशोधनावरून सिद्ध होते. 'टाबू' (Taboo) आणि 'माना' (Mana) या मौलिक अशा मानवजातिशास्त्रज्ञांनी स्वीकारलेल्या कल्पना आहेत. त्या जादूटोणा व विविध धार्मिक रूढी यांचा अर्थ उमगण्यास उपयोगी