पान:Samagra Phule.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(सतरा) प्रस्तावना ती स्त्री असो, पुरुष असो, तो कोणीही मानव असो, सत्यशोधक समाजसेवक असो अथवा एखादा गावठेकर असो.. या पृथ्वीच्या पृष्ठभागात जेवढी म्हणून मानवांनी पुस्तके लिहिली आहेत त्यांपैकी काही ग्रंथात आरंभापासून शेवटपर्यंत सर्व सार्वजनिक सत्य होय, असे प्रत्येक धर्मपुस्तकात म्हटले आहे. काही व्यक्तींनी त्यावेळच्या प्रसंगास अनुसरून हेकटपणा दाखवून जे धर्मग्रंथ लिहिले ते एकंदर सर्व मानवी प्राण्यांना सारखे हितकारक न होता साहजिकच यामध्ये अनेक भेद निर्माण करून ठेवले. ते एकमेकांचे मनापासून हेवा व द्वेष करतात. प्रत्येक व्यक्तीस मानवी अधिकारांचा यथायोग्य उपभोग घेता यावा. आपल्या या सूर्य मंडळासहित पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक आहे तर तिजवरील अनेक देशांतील लोकांचे एकमेकांचे वैरभाव माजवून प्रत्येकामध्ये देशाभिमान व धर्माभिमानाचे खूळ व्यर्थ का माजविले आहे ? त्याचप्रमाणे या पृथ्वीवरील अनेक देशांतील सर्व नद्या महासागरात मिळत असतात, त्यांपैकी एका देशातील नदी तेवढी पवित्र कशी होऊ शकेल? या पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकंदर सर्व मानवी प्राणी अवयवाने व बुद्धिकौशल्याने एकसारखे असून त्यापैकी काही लोक पिढीजात पवित्र बनतात. ते श्रेष्ठ कसे होऊ शकतील? सर्वांना सारखे जन्म-मरण असून ते सर्वांप्रमाणे सद्गुणाने व दुर्गुणाने निपुण नाहीत का? कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता, एकंदर सर्व मानवांपैकी जे कोणी आपल्या कुटुंबाचे पोषण करताना जगाच्या कल्याणासाठी सतत कर्म करीत असतात ते आर्य असो, अथवा अमेरिकेतील असो, अथवा ज्याला तुम्ही नीच मानता असा एखादा (चांडाळ) मृतप असो, ते अन्नदान घेण्यास पात्र आहेत. त्यालाच अन्नदान केल्याने निर्मिकाला आनंद होणार आहे." वरील विचार वाचले म्हणजे विचक्षण वाचकांच्या ध्यानात येते की, हे विचार भारतातील लोकशाही क्रांतीच्या अग्रदूताचे विचार होत. सर्व मानवांचे जे जीवन व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता यांनी भरले आहे, ते सामाजिक जीवन हेच पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य होय. अशा त-हेचा निर्वाळा जोतीबा अनेक ठिकाणी देतात. पृथ्वीवर ईश्वराचे राज्य ही कल्पना जोतीबांना ख्रिश्चन धर्मापासून मिळाली असावी असे स्पष्ट दिसते. आदर्श लोकशाही-जीवनपद्धती आणि विश्वकुटुंब याच पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य असे जोतीबा म्हणतात. ख्रिश्चन कल्पनेवर जोतीबांनी नव्या मानवी मूल्यांच्या कल्पनेचा संस्कार करून ख्रिश्चन धर्माच्या कल्पनेहून निराळे पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य आदर्श म्हणून आपल्यापुढे ठेवले आहे. जोतीबा राष्ट्रवादी नव्हते. परंतु “राष्ट्र' म्हणून संबोधन करताना त्यांच्या मताप्रमाणे "स्वातंत्र्य आणि समता यांच्यावर आधारलेला प्रादेशिक समाज" असा राष्ट्र याचा अर्थ होतो. जातीजातींत व धर्माधर्मांत निबद्ध झालेल्या समाजाची गाठोडी म्हणजे राष्ट्र नव्हे असे ते अनेक ठिकाणी सांगतात. त्यांच्या मताने कोणताही प्रादेशिक समाज विश्वसमाजाचा एक घटक म्हणूनच राहिला पाहिजे. मानवांना धर्मसंस्थांनी एकमेकांपासून एच-२२