पान:Samagra Phule.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय भाग९वा -- वेदमंत्र, जादूचे वजन, मूठ मारणे, देव्हारे घुमविणे, जप, चार वेद, ब्रह्मघोळ, नारदशाई, नवीन ग्रंथ, शूद्रांस ज्ञान देण्याची बंदी, भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा इत्यादिकांविषयी. धों - तुम्हीं खुंटीस नांगर बराच लावला बरें! तुमच्या म्हणण्याप्रमाणे परशुराम मेला व त्याची मातीस माती मिळाली, असे का होईना. परंतु बाकीच्या सर्व क्षेत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या मंत्राचे वजन कसें बसलें ? हे कळू द्या. जो -- कारण त्या काळी युद्धामध्ये ब्राह्मण लोक हर एक शस्त्रांवर मंत्रविधी करून त्यास अस्त्रांची योग्यता आणिल्याशिवाय शबूंवर त्यांचा उपयोग करीत नसत. त्यांनी जेव्हा अशा नानात-हेच्या चेष्टा करून बाणासुरास रयतेसहित त्याच्या राज्याची व कुळाची अशी राखरांगोळी केली; तेव्हा सहजच बाकी सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या विद्येची धास्ती बसली. यास उदाहरण - भृगु नामक ऋषीने जेव्हां विष्णूच्या छातीवर लाथ मारली, तेव्हा विष्णु (त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आदिनारायण) ऋषीच्या पायांस श्रम झाले असतील याजकरितां चोळू लागला. आतां यांतील भावार्थ शुद्ध आपमतलबी आहे. तो असा की, ज्या अर्थी साक्षात् आदिनारायण जो विष्णु त्याने ब्राह्मणाचे लाथेस सहन करून त्याचे पाय दाबिले, त्या अर्थी आम्ही जे शूद्र (त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शूद्र प्राणी) त्यांनी आपले, ब्राह्मण लाथाबुक्क्या देऊन, प्राण जरी घेऊ लागले, तरी हूं की चू करू नये. असे आमच्या मनांत ठसावे हाच या लबाडीचा उद्देश आहे. धों तर मग आतांच्या हलकट लोकांजवळ जी कांही जादूमंत्र विद्या आहे ती तरी त्यांनी कोठून घेतली असावी? जो हल्लीच्या लोकांजवळ जी कांही मूठ मारण्याची, मोहिनी घालण्याची बंगाली जादूमंत्रविद्या आहे, ती केवळ वेदांतील जादूमंत्रविद्येपासून त्यांनी घेतली नसावी असें कोणाच्याने म्हणवणार नाही. कारण, आतां जरी तिच्यामध्ये अतिशय फेरफार होऊन बराच अपभ्रंश झाला आहे, तथापि तिच्यांतील बहुतेक मंत्रात आणि यंत्रांत ॐनमो, ओं नमः, ओं न्ही नः वगैरे वेदमंत्रातील वाक्याचा बराच भरणा सांपडतो. यावरून ब्राह्मणांच्या मूळ पूर्वजांनी या देशांत येऊन बंगाल्यात प्रथम वस्ती केल्यानंतर त्यांची जादूमंत्रविद्या तेथून चहूंकडे पसरली गेल्यामुळे तिचें नांव बंगाली विद्या पडले असावें. इतकेच नव्हे, तर आर्यांचे पूर्वज आतांच्या आडाणी लोकांसारिखे देव्हारा घुमविणारेसुद्धा होते. कारण पूर्वी त्यांजमध्ये देव्हारा घुमविणाऱ्या लोकांस ब्राह्मण म्हणत असत व ते सोमरस या नांवाची दारू पिऊन तिच्या तारेमध्ये बडबड करून आम्हांबरोबर देव बोलतो म्हणून इतर अज्ञानी लोकांस फसवित होते, असे त्यांच्याच वेदावरून सिद्ध होते व त्याच आधारावरून हल्ली अशा सुधारलेल्या काळात आतांचे ब्राह्मण भट आपली पोटें जाळण्याकरितां जप, अनुष्ठाने, १ कित्येक युरोपियन ग्रंथकारांची मते आहेत. -- --