पान:Samagra Phule.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय भटपंतोजीच्याने शूद्रांस आम्ही लिहिणे शिकविणार नाही, असे उघड तोंडाने म्हणवत नाही, तथापि त्यांच्याने आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शूद्रांस त्यांविषयी खरा समज देऊन आपलें महत्त्व कमी करून घेववत नाही. सबब ते शूद्रांचे मुलांस केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञानसुद्धां न शिकवितां ते त्यांच्या मनांत अनेक त-हेची अपुरती देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरवून त्यांस पक्के इंग्लीश राज्यभक्त, करून अखेरीस त्यांस शिवाजीसारिख्या धर्मभोळ्या, अज्ञानी, शूद्र राजाने आपला देश म्लेंच्छापासून सोडवून गाई-ब्राह्मणांचे कसे पालन केले, याविषयी अनेक हुलथापा देऊन त्यांस पोकळ स्वधर्माभिमानी करून सोडितात. यामुळे शूद्र समाजाचे मानाप्रमाणे ते मोठाली जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत. एकंदर सर्व खात्यांत भटांची गर्दी होऊन ते शूद्रांवर इतक्या सफाईनें जुलुम करितात की, त्याविषयी यथासांग हकीगत लिहूं गेल्यास, कलकत्त्यातील नीळ पिकविणाऱ्या इंग्लीश लोकांचे जुलूम ‘खंडीत नवाटकेसुद्धा भरणार नाहीत.' आता चहुंकडे भटांच्या हातांत (नावांला मात्र टोपीवाले) सत्ता असल्यामुळे तें गरीब व अज्ञानी शूद्र रयतेचे तर काय, पण ते सरकारचेसुद्धा अनिवार्य नुकसान करीत आले आहेत व ते यापुढेही सरकारचे नुकसान करणार नाहीत असे कोणाच्याने म्हणवणार नाही. याविषयी आमच्या शहाण्या सरकारास माहिती असून ते, आंधळ्याचे सोंग घेऊन केवळ भटांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या धोरणाने वागते. यास्तव यापासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होईल यांत तिळमात्र संशय नाही. सारांश, ब्रह्मयाने येथील मूळच्या क्षेत्रवासी लोकांस दास केल्यानंतर तो गर्वाने इतका फुगला होता की, महाअरींनी त्याचे नाव थट्टेने "प्रजापती' पाडिलें होतें असा तर्क निघतो. परंतु ब्रह्मया मेल्यावर आर्य लोकांच्या मूळच्या भट नांवाचा लोप होत जाऊन त्यांचे नांव ब्राह्मण पडलें. भाग ८ वा -- परशुराम, मातृवध, एकवीस स्वाय, दैत्य, खंडेरावाने रावणाचा आश्रय केला, नऊखंडाची जाणाई. सात आसरा, महारांच्या गळ्यांतील काळा दोरा, अतिशूद्र अंत्यज, मांग, चांडाळ, महारास जिवंतच पायांमध्ये दडपणे, ब्राह्मणांत पाट लावण्याची बंदी, क्षत्रिय अर्भकांचा वध, परभु, रामोशी, जिनगर वगैरे लोक परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुराम यास आमंत्रण इत्यादिकांविषयी. धों प्रजापती मेल्यावर ब्राह्मणांचा अधिकारी कोण झाला? जो परशुराम. धों परशुराम स्वभावानें कसा होता? जो - परशुराम स्वभावाने पुंड, साहसी, नष्ट, निर्दय, मूर्ख आणि अधम होता. तो आपल्या जन्म देणाऱ्या रेणुकेचे शीर उडविण्यास काडीमात्र भ्याला नाही. तो शरिराने फार बळकट असून मोठा तिरंदाज असे. -- AC--