पान:Samagra Phule.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय देऊन ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फोडितात; नंतर त्यास उल्लंघून घरांत शिरतात, अशी वहिवाट सांपडते. त्याचप्रमाणे बाणासुराचे लोक अश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरोघर गेले, तेव्हां त्यांच्या स्त्रियांनी पुढे दुसरा बळी येऊन देवाचें राज्य स्थापील, याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबऱ्यांत उभ्या राहून त्यांस ओंवाळून अशा म्हणाल्या की, "इडा पीडा (द्विजांचा अधिकार) जावो आणि बळीचे राज्य येवो." त्या दिवसापासून आजदिवसपर्यंत शेकडो वर्षांची वर्षे लोटली, तथापि बळीच्या राज्यांतील कित्येक भागांमध्ये क्षत्रीय वंशांच्या स्त्रियांनी दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीस संध्याकाळी आपापल्या पतीस व पुत्रास ओवाळून पुढे येणान्या बळीचे राज्य यावे म्हणून इच्छिण्याचे अद्याप सोडिलें नाही. यावरून तो येणारा बळी राजा किती उत्तम असेल ! धन्य तो बळी राजा आणि धन्य ही राजनिष्ठा ! नाही तर आतांचे सोंवळे हिंदू लोक, इंग्लिश लोकांनी मेहेरबान होऊन आपल्यास मोठमोठे हुद्दे द्यावे म्हणून ते राणीच्या वाढदिवशीं भरसभेत त्यांच्या बढतीविषयी मोठमोठाली व्याख्याने देतात आणि त्यांचेविरुद्ध वर्तणूक वर्तमानपत्रांत अगर साहजिक बोलण्यांत दाखवितात. धों -बरें, ते बळीराजानें बोलावलेले सरदार मुळीच त्याचे मदतीस आले नाहीत काय? मागाहून ते कित्येक लहानसहान क्षेत्रपतींसहित आपापल्या फौजा घेऊन अश्विन शुद्ध चतुर्दशीस बाणासुरास येऊन मिळतांच बळीच्या राज्यांतील एकंदर सर्व विप्र आपले जीव घेऊन वामनाकडे पळून गेले. यावरून वामनास इतकी पांचांची धारण पडली की, त्याने आपल्या एकंदर सर्व विप्रांस जमा करून पुढे बाणासुरापासून आपला बचाव कसा करून घ्यावा म्हणून अश्विन शुद्ध पोर्णिमेस ' सर्व रात्रभर जागर करून आपल्या देवांपुढे प्रसादरूप फांसे टाकीत बसला. नंतर त्याने दुसरे दिवशी आपल्या बायकामुलांसहित सर्व फौज बरोबर घेऊन आपल्या मुलुखाच्या हद्दीवर येऊन तो बाणासुराची वाट पहात जो -- बसला. --- धों नंतर बाणासुराने काय केले? जो नंतर बाणासुरानें वामनावर एकदम हल्ला करून त्याचा अगदी मोड करून त्याजवळचे सर्व लुटून घेतले. नंतर त्यास त्यांच्या सर्व लोकांसहित प्रथमतः त्याने आपल्या मुलुखांतून जरजर करून हिमालयपर्वतावर हांकलून दिले. नंतर त्याने त्या पर्वताच्या पायथीं तळ देऊन वामनास दाण्यास इतका महाग केला की, त्याचे बहुतेक लोक केवळ उपासाने मरूं लागले. यास्तव वामनाचा अवतार त्या काळजीने तेथेच संपला, म्हणजे वामन मरण पावला. त्यावरून बाणासुराचे लोकांस मोठा आनंद होऊन ते असें म्हणाले की, वामन ही विप्रांपैकी एक मोठी उपाधि होती, ती नाहीशी झाल्याने आपली पीडा दूर झाली, तेव्हांपासून विप्रांस उपाध्ये म्हणण्याची वहिवाट पडली असावी, असा तर्क निघतो. पुढे ' ज्यास कुजागरी अगर कोजागरी पौर्णिमा म्हणतात.