पान:Samagra Phule.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय सर्व पंचप्राण आमच्यापासून जन्म पावणारे बालकांकडेस लागलेले आहेत. आतां आम्हांस काय तें येवढेच दुःखांत सुख व आमचे सुखाचें निधान जी आमची बालकें, त्यांचे प्राण घेऊन आम्हा अनाथ स्त्रियांस कां या सर्व आयुष्यभर शोकार्णवांत टाकितां! आम्हास येवढी भिक्षा घाला, आम्ही तुमच्या धर्माच्या लेकी आहोत आमची कशीही करून आपणास दया येऊ द्या. इतके करुणापर शब्द बोलल्याने त्या दुष्टाचे अंतःकरण कांहीतरी द्रवावें, परंतु मुळीच नाही. त्याने त्या प्रसूत झालेल्या पाहून त्यांजपासून त्यांची बालकें हिसकावून घेऊ लागला. तेव्हां त्या त्यांच्या संरक्षणाकरिता त्यांच्यावर पालथ्या पडून पुढे मान करून म्हणाल्या असतील की, अहो परशुरामा, तुम्हाला जर या मुलांचे प्राणच घेणे आहे तर प्रथम आमचे शीर उडवा, मग आमचे पाठीमागे त्यांचे काय करणें तें करा. आमचे समक्ष त्यांचे प्राण घेऊ नका, परंतु कांहीं हो त्याने ऐकिलें नाही. हर! हर! त्यांच्याजवळून जेव्हा त्यांची मुलें हिसकावून घेतली असतील, तेव्हां त्यांस जे दुःख झाले असेल ते लिहिण्यास आमचे हातांतून लेखणी गळून पडते. असो, त्या चांडाळाने त्या मुलांचे प्राण त्यांचे आयांसमक्ष घेतले, तेव्हां कांहीं जणींनी आपले उर बडविलें, केस तोडिलें व तोंडात माती घालून घेऊन प्राण दिले असतील; कांही जणींनी पुत्रशोक करून प्राण सोडिले असतील व काही जणीला वेड लागून, हा पुत्र! हा पुत्र! करीत भटकत फिरूं लागल्या असतील. ही सर्व हकिकत भट लोकांपासून आम्हास समजेल अशी आम्हास मुळीच आशा बाळगायास नको. याप्रमाणे भट लोकांचा मुख्याधिकारी जो परशुराम ज्याने शेंकडों क्षत्रिय लोक मारून त्यांचे बायकांमुलांची दुर्दशा करून टाकिली व त्यास हल्ली भट लोकांनी शूद्रांदिअतिशूद्र लोकांस सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्व जगाचा उत्पन्न कर्ता असे म्हणविण्यास लाविलें आहे, हे मोठे आश्चर्य आहे. परशुरामाचे पाठीमागें भट लोकांनी त्यांस कमी छळिलें असें नाही, तर त्यांनी आपल्याकडून जितके छळवेल तितकें त्यास छळिलें. त्यांनी त्या लोकांपैकी बरेच लोकांस त्वेषामुळे त्यांची दुर्दशा करून जिवंतच इमारतीचे पायांत दडपीत, याजविषयी या ग्रंथांत लिहिलेच आहे. त्यांनी त्या लोकांस इतकें तुच्छ मानावें की, एकादे वेळेस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धूत असतां त्या स्थळी जर एकादा भट आला, तर त्या शूद्रांस आपली सर्व वस्त्रे गोळा करून, बऱ्याच दूर अंतरावर, जेथून भटाच्या आंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल, अशा स्थळी जाऊन आपली वस्त्रे धुवावी लागत असत. तेथून जर भटाच्या आंगावर पाण्याचा शिंतोडा आला, अथवा आला असा खोटा भास झाला, तर त्या भटाने अग्निसारखें रागानें तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून मोठे त्वेषाने मारावे, त्याजमुळे त्याचे मस्तक रक्तबोंबाळ होऊन मुछित होत्साता जमीनीवर धाडकन पडावें, पुढे काही वेळानें शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्रे घेऊन निमूटपणे घरी जावें, सरकारास तर कळवावें तर सव भटशाई पडली. उलटी त्यासच सजा देणार, हर! परमेश्वरा केव्हढा हा अन्याय! असो. एक दुःख आहे म्हणून सांगावें, अशी व यापेक्षा अधिक दुसरी पुष्कळ दुःखें शूद्रादि अतिशूद्रांस सोसावी लागत असत, भटराज्यांत त्यांस व्यापाराच्या अथवा दुसऱ्या गोष्टींच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी