पान:Samagra Phule.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय अंशी खेद वाटून काहीसें बरे वाटेल की आजपर्यंत कवितेत त्यास शोकरसाची पूर्णपणे तसवीर श्रोत्यांचे मनामध्ये ठसविण्याकरितां महाप्रयत्नांने काल्पनिक उदाहरणे रचावीं लागत. तर त्यांचे ते सर्व श्रम असें ढळढळीत साकार उदाहरण सांपडल्यामुळे नाहीसे केले. असे जर आहे तर हल्लीचे शूद्रादि अतिशूद्र यांची अतःकरणे आपण ज्यांचे वंशात उत्पन्न झालों व ज्यांचे व आपले रक्तमांस एकच आहे, हा जेव्हां विचार त्यांचे मनामध्ये येतो, तेव्हा त्यांची दुःखें एकूण परम दुःखीत होत असतील यांत मोठे आश्चर्य आहे असे काही नाही. एके वेळी भट राज्यांत त्यांच्यावर जे काही प्रसंग गुदरले होते त्यांची आठवण झाली असतां आमची मने भयभीत होऊन आमचे अंगावर रोमांच उभे राहतात व मनामध्ये लागलीच असे विचार येतात की, ज्या प्रसंगाची आठवण आम्हास जर इतकी दुःखदायक होती, तर ज्यांनी ते प्रसंग सोशिले असतील त्यांची मनाची काय स्थिति झाली असेल, हे त्यांचे त्यांना ठाऊक. याजविषयी चांगले स्पष्ट उदाहरण आमचे भटबंधूच्याच ग्रंथामध्ये सांपडते. तें असें की, या देशातील मूळचे रहिवासी क्षत्रिय लोक यांजबरोबर भट लोकांचा मुख्याधिकारी परशुराम या नामें गृहस्थाने किती क्रूरता दाखविली, हे या ग्रंथात जाणविलेंच आहे. तथापि त्याचे क्रुरतेविषयी इतकें समजले आहे की, त्याने पुष्कळ क्षत्रिय लोकांचे प्राण घेऊन त्यांचे अनाथ झालेल्या स्त्रियांपासून त्यांची लहान लहान चार चार, पांच पांच महिन्यांची गरीब बिचारी निर्दोषी बालकें हिसकावून घेऊन अंतःकरणांत कांही द्रव न पावतां, त्यांचे प्राण की हो मोठे दुष्ट रीतीने हरण केले. तो दुष्ट इतकेच करून राहिला असें नाही तर त्याने कित्येक, आपले पतींच्या मृत्युमुळे दीन झालेल्या स्त्रिया, आपले पोटांत संभवलेल्या गर्भाच्या संरक्षणार्थ रानोमाळ मोठ्या क्लेशाने पळत असतां त्यांचा पारध्याप्रमाणे पाठलाग करून त्यांस पकडून आणून त्यांचे प्रसूतकाळी त्यांस पुत्र झाला असें ऐकिले मात्र पुरे की, लागलीच येऊन त्यांचे प्राण घ्यावे. येणेप्रमाणे हकीगत भट लोकांचे ग्रंथात आढळते व ज्या अर्थी भट लोक त्यांचेविरुद्ध पक्षाचे होते, त्या अर्थी त्यांजपासून त्या वेळची सर्व वास्तविक हकीगत समजेल, असे आम्हास स्वप्नांतदेखील आणावयाला नको. भट लोकांनी तिचा पुष्कळ भाग गाळला असावा, याच्यांत काही संशय नाही. कारण कोणी आपले तोंडाने आपण केलेले वाईट कर्म सांगत नाही. आतां वर सांगितलेली हकीगत त्यांनी आपले ग्रंथात लिहून ठेविली हे एक मोठे आश्चर्य आहे. आमचे विचारास असें येते की, परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रिय लोकांचा मोड करून त्यांची वाताहत केली व त्यांचे हतभागी स्त्रियांचे लहान लहान मुलांस मारिलें, याच्यांत मोठा पुरुषार्थ केला व तो इतर जनांस माहीत व्हावयाकरितां भट लोकांनी आपले ग्रंथात लिहून ठेविला. अथवा जगांत प्रसिद्ध म्हण आहे की, “तळहाताने सूर्य झांकिला जात नाही." त्याप्रमाणे ही हकीकत जरी त्यांस मोठी लज्जास्पद होती, तथापि तिचा मोठा गवगवा झाल्यामुळे त्यांच्याच्याने जितकी झांकवेल तितकी त्यांनी झांकून, जेथें उपायच नाही तेथें लिहून ठेवणे त्यांस जरूर पडले, बरें, भट लोकांनी जितकी हकीकत लिहिली