पान:Samagra Phule.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० महात्मा फुले : समग्र वाङ्मय मोठे महत्त्वाचे असून लोकांना हितावह कां असेनात, तथापि ते त्यास दुसरे कोणास कळविता येत नाहीत आणि असे झाले म्हणजे काही काळाने ते सर्व विचार लयास जातात. त्याचप्रमाणे मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले, सर्व मनुष्यमात्रांस जे सर्वसाधारण हक्क, सर्व जगाचा जो नियंता व सर्वसाक्षी परमेश्वराने त्याने दिलेले असून केवळ स्वहिताकडेच ज्यांचे लक्ष्य, असे कृत्रिमी लोकांनी लपवून ठेविले, तर त्यांपासून मागून घेण्यास कधी मागे सरणार नाही व त्यांचे हक्क त्यास मिळाले असता त्यास सुख होतें. ज्याची त्यांस स्वतंत्रता देऊन त्यास जुलमी लोकांचे अन्यायी जुलमांपासून सोडवून सुखी करणे हाच काय तो, त्यांचे असें जिवावरचे व धोक्याचे काम करण्याचा हेतु होय. अहाहा!! हैं कितीतरी परोपकारांचे स्तुत्य कार्य होय! असा त्यांचा चांगला उद्देश असल्यामुळे ईश्वर त्यांस, जेथें तें जातील तेथें बहुतकरून जयच देत गेला व तेथून पुढेही त्यांस असे चांगले कृत्यामध्ये त्यांचे प्रयत्न सफळ होऊन त्यांस जयच मिळो, अशी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करितो. अमेरिका व आफ्रिका या दोन पृथ्वीच्या मोठे भागांमध्ये शेंकडों वर्षापासून दुसरे देशांतून मनुष्ये धरून आणून त्यांस गुलाम करण्याची वहीवाट चालू होती, तिजमुळे एकंदर सर्व युरोपखंडातील व दुसरे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुधारलेले राष्ट्रांस मोठी लज्जा प्राप्त झाली होती, ती दूर करण्याकरिता इंग्लीश, अमेरिकन वगैरे उदार लोकांनी मोठमोठाल्या लढाया करून आपले नुकसानीची तर काय, पण आपले जिवाचीदेखील परवा न करतां ती फार दिवसांपासून चालत आलेली दुष्ट चाल तळाबुडानिशी नाहीशी करून पुष्कळ गुलामांस त्यांचे परम आवडते आईबापांपासून, बहीणभावंडांपासून, मुलांबाळांपासून व स्नेहीमंडळीपासून दुष्ट लोकांनी एकाएकी ताडातोडी करून उभयपक्षांस परम दुःख झाल्यामुळे ते दिवसानुदिवस झुरणीस लागून मरण्याच्या बेतांत आहेत तोच त्यांस एकमेकांस भेटविलें. अहाहा!! अमेरिकन वगैरे सदाचारी लोकांनी कितीतरी चांगले काम केलें बरें! आज त्यांस त्या गरीब अनाथ गुलामांची दुर्दशा पाहून दया आली नसती तर ते गरीब, बिचारे आपल्या प्रियकर मंडळीस भेटण्याची इच्छा तशीच मनामध्ये ठेवून मरण पावले असते. बरें, त्यांस धरून आणणारे दुष्ट लोक त्यांस चांगले रीतीने तरी ठेवीत असत काय? नाही, नाही. त्यांस ते लोक जे जे जाच करीत, ते ऐकिले असतां पाषाणहृदयाच्या मनुष्याचादेखील कंठ दाटून येऊन त्यास रडे आल्यावांचून राहणार नाही. ते त्यांस पशूवत समजून त्यांजबरोबर नेहमीं लाथाबुक्यांशी काम ठेवीत. कधी कधी ते त्यास भर उन्हामध्ये नांगराला जुंपून त्यांजपासून आपली शेतें नांगरून घेत असत व त्यांनी कांही कमजास्त केले असता त्यांचे अंगावर बैलाप्रमाणे कोरड्याचे वळचे वळ उठवीत. बरें, इतकेंही असून ते त्यांचे पोटापाण्याची तरी नीट व्यवस्था राखीत काय? मुळीच बोलायला नको, एक वेळ मिळालें एक वेळ नाही व जे अन्न मिळे ते अगदी कनिष्ठ प्रतींचे असून फारच थोडें असे, यामुळे त्यांस नेहमी अपूर्तेच पोटाने उठणे भाग पडे. त्यांच्याकडून दिवसात छाती फुटून रक्त ओकत तोपर्यंत काम घेऊन त्यांस अपरात्री गुरांचा गोठा वगैरे घाणेरडे जाग्यांत निजायास सोडीत. तेथें थकून आल्यानंतर ते गरीब बिचारे त्या