पान:Samagra Phule.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १३९ लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेच आहे. अशा ग्रंथांपासून ईश्वराच्या वैभवाला केवढा नीचपणा भट लोकांनी आणिला आहे बरें ? ज्या ईश्वराने शूद्रादि अतिशूद्रांस व इतर लोकांस आपण निर्माण केलेल्या सर्व सृष्टीतील वस्तूंचा सारिखे रीतीने उपभोग घेण्याची मोकळीक दिली असून, भट लोकांनी त्याचे नांवचे खोटे ग्रंथ बनवून त्यांजमध्ये सर्वांचे हक्क रद्द करून आपणच अग्रगण्य होऊन बसले. याजवर आमचे कोणी भट बंधु अशी शंका घेतील की, हे ग्रंथ जर खोटे आहेत तर त्याजवर शूद्रादि अतिशूद्र यांचे पूर्वजांनी कसा भरंवसा ठेविला व हल्लींही त्यांपैकी पुष्कळ कसा भरंवसा ठेवितात ? तर त्याचे उत्तर असे आहे की, आतांच्या या सुधारलेल्या काळांत कोणावर काही जुलूम नसून सर्वांस आपल्या मनातील विचार स्पष्ट रीतीने लिहिण्याची अथवा बोलण्याची परवानगी असून एखाद्या शहाण्या गृहस्थाकडे कोणी लबाडाने एखाद्या मोठ्या गृहस्थाच्या नांवाचे खोटे पत्र जरी आणले, तथापि त्यास कांहीं वेळपर्यंत त्याजवर भरंवसा ठेवावा लागतो व समयानुसार तोहि फसला जातो. अशी जर गोष्ट आहे, तर शूद्रादि अतिशूद्र एके वेळी भट लोकांचे जुलूमाचे तडाक्यांत सांपडल्यामुळे व त्यांस त्यांनी सर्वस्वी अज्ञानी करून सोडिल्यामुळे आपले हिताकरितां समर्थाचे नांवाचे खोटे ग्रंथ करून त्यांजकडेस त्यांचे मन वळवून त्यांस फसविलें व अद्यापही त्यांपैकी कित्येकांस भट लोक हल्ली फसविताहेत. हे शुद्ध वर सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे आहे. भट लोक आपले पोट भरण्याकरितां आपले स्वार्थी ग्रंथांतून वारंवार जागोजागी अज्ञानी शूद्र लोकांस उपदेश करितात, त्याजमुळे त्यांच्या मनामध्ये त्याजविषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न होऊन त्यांस त्यांनी (भट लोकांनी) ईश्वरालाच मात्र जो योग्य सन्मान तो आपणास देवविण्यास लाविलें आहे, हा कांहीं लहानसहान अन्याय नव्हे. याजबद्दल भट लोकांस ईश्वराजवळ जबाब द्यावा लागेल. त्यांच्या उपदेशांचा ठसा बहुतेक अज्ञानी शूद्र लोकांचे मनावर इतका दृढ झाला की, ते अमेरिकेतील गुलामांसारिखें आपणास, ज्या दुष्ट लोकांनी दास केले त्यांपासून सोडवून स्वतंत्रता देणाऱ्या लोकांविरुद्ध उलट्या कंबरा बांधून लढण्यास तयार झाले. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की, आपणावर जे कोणी उपकार करीत असतील, त्यांस आम्हांवर उपकार करूं नका, आमची जी हल्लींची स्थिति आहे तीच बरी आहे, असें केवळ म्हणून तृप्त न होतां त्यांजबरोबर तंटा करण्यास प्रवृत्त होतात. बरें. आपणास दास्यत्वापासून मुक्त करणारे जे लोक, त्यांचे आपणास सोडविल्यापासून काही हीत होतें हेही काही नाही, उलटे त्यांस आपले लोकांपैकी शेकडो लोकांचे बळी द्यावे लागतात व मोठमोठी साहसकर्म पत्करून आपले जीव धोक्यात घालावे लागतात. आतां असें परोपकारांचे कृत्य करण्याचा त्यांचा हेतु तरी काय असावा, याजविषयी आपण थोडासा विचार केला असतां लागलीच आपणास कळून येईल की, मनुष्याला स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरूरीची गोष्ट आहे. जेव्हां मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हां त्यास आपले मनांत उद्धभवलेले विचार स्पष्ट रीतीने इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखविता येतात. तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळे