पान:Samagra Phule.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय प्रस्तावना या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे की, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडेस त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तिजविषयीं नीट विचार करणे व येथून पुढे भटब्राह्मण लोकांचे अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणे हाच काय तो आहे. या देशांत भट लोकांचे राज्य होऊन सुमारे तीन हजार वर्षांपासून अधिक काळ लोटून गेला असावा, असें अनुमान होते. ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक त-हेची क्रूर शासने दिली. पुढे काही काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचे मुळीच छपवून ठेविले. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले; कारण त्या वेळेस ते लोक सत्तेच्या संबंधानें पूर्वी पराधीन झालेलेच होते व पुढे त्यांस भट लोकांनी ज्ञानहीन करून टाकिलें, याजमुळे भट लोकांचे पांचपेंच त्यांचे लक्षांत मुळीच आले नाहीत. त्यांनी त्यांच्यावर वर्चस्व मिळवून त्यांस अक्षय आपले ताब्यात ठेवण्याकरितां केवळ स्वहितास अनुलक्षून पुष्कळ बनावट ग्रंथ करून ते आपणा सर्वांस ईश्वरापासून प्राप्त झाले, असे त्या वेळचे अज्ञानी लोकांस सांगून त्यांचे मन सर्वस्वी वळविले. त्या ग्रंथांत त्यांनी असे लिहिले की, शूद्रांस ईश्वराचा उत्पन्न करण्याचा हेतु इतकाच आहे की, त्यांनी सदासर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावें व जेणेकरून त्यांची मर्जी खुष राहील असे करावे; म्हणजे ते ईश्वराला पावन होऊन त्यांचे देहाचें व जन्मास येण्याचे सार्थक झाले. आतां कोणी या ग्रंथांविषयी थोडासा विचार केला असतां ते कितपत खरे आहेत व ते ईश्वरापासून आले असावे किंवा कसे, हे लागलीच कळून येईल. अशा ग्रंथांपासून सर्वशक्तिमान, सर्व जगाचा व त्यांतील सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता जो परमेश्वर त्याच्या समसृष्टीला मोठे गौणत्व आणले, असे आमचे जे हल्लीचे शहाणे भट बंधु, ज्यांस बंधु म्हणण्यास मोठी लज्जा प्राप्त होती; कारण त्यांनी एके वेळी शूद्रादि अतिशूद्रांस फार दुःखें दिली व हल्लीही ते धर्माच्या योगानें त्यापासून दुःखें सोशीत आहेत आणि एकमेकास दुःख देणे हा बंधुधर्म नव्हे, तथापि त्यांस आम्हा सर्वांचे उत्पन्नकर्त्याच्या संबंधानें बंधु म्हणणे भाग पडते; तर ते देखील उघड रीतीने असें म्हणण्यास सोडणार नाहीत, मात्र त्यांनी स्वहिताकडेस लक्ष न देतां केवळ न्यायास अनुसरून विचार केला पाहिजे. असें जर आहे, तर ते ग्रंथ आमचे शहाणे इंग्रज, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन व दुसरे विद्वान लोक पाहून (ते) शुद्ध मतलबी आहेत, ज्यांत सर्व प्रकारे ब्राह्मणांचे महत्त्व सांगून त्यांस त्यांची लोकांचे मनावर वजनदारी बसावी याजकरितां ईश्वरापेक्षांदेखील श्रेष्ठ मानिले आहेत, असें संमत दिल्यावांचून राहणार नाहीत. त्यांतून वर सांगितलेले लोकांपैकी इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणी इतिहास वगैरे ग्रंथांत भट