पान:Samagra Phule.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(दहा) महात्मा फुले : समग्र वाङ्मय अस्सल कागदपत्रांचा अंतर्भाव केलेला आहे. शाळांसंबंधीचे हे कागदपत्र महाराष्ट्र शासनाच्या मुंबईतील पुराभिलेखागारात आढळले. ते त्या विभागाच्या संचालकांच्या अनुमतीने प्रसिद्ध केले आहेत. जोतीराव फुल्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समकालीनांनी त्यांच्या जीवनकार्याचे कसे मूल्यमापन केले हे आजच्या वाचकांना माहीत असावे म्हणून त्या काळात प्रसिद्ध झालेल्या काही मृत्युलेखाचाही एका परिशिष्टात समावेश केलेला आहे. महात्मा फुल्यांच्या लेखनात परदेशातील काही ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचे तसेच पुस्तकांचे उल्लेख केलेले आढळतात. फुल्यांच्या काळात हिंदुस्थानात विशेषतः मुंबई इलाख्यात इंग्रजी राजवटीची सेवा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचा नामनिर्देशही फुल्यांनी केलेला आहे. समकालीन भारतीय पुढाऱ्यांचा तसेच वृत्तपत्रांचा जोतीरावांनी कधी कधी स्पष्टपणे नामनिर्देश केलेला आहे तर कधी आडवळणाने, नामनिर्देश न करता काही व्यक्तींविषयी आणि घटनांविषयी लिहिलेले आहे. तत्कालीन वृत्तपत्रांच्या उपलब्ध संचिका वाचलेल्या असल्यास फुले आडवळणाने कोणावर टीका करीत आहेत हे ओळखता येते. सत्याशोधक समाजाच्या वार्षिक अहवालात सभासदांची यादी छापलेली आढळते. त्यांच्यापैकी काही महत्त्वाच्या सत्यशोधकांविषयी आज अनेक वाचकांना फारशी माहिती नसल्याचे जाणवते. शंभर वर्षांनंतर महात्मा फुल्यांचे समग्र वाङ्मय वाचणाऱ्या आजच्या वाचकाला तत्कालीन घटना, फुल्यांचे समकालीन वगैरेंची ओळख व्हावी आणि त्यांच्या लेखनातील संदर्भ स्पष्ट व्हावेत म्हणून विस्तृत टिपा दिल्या आहेत. या आधीच्या तीन आवृत्त्यांमध्ये अशा टिपा दिलेल्या नव्हत्या. या आवृत्तीचे संपादन करताना पहिल्या आवृत्तीचे संपादक डॉ. स. गं. मालशे तसेच डॉ. अरुण टिकेकर आणि श्री. हरि नरके यांच्याबरोबर केलेल्या चर्चेचा खूप उपयोग झाला. त्यांनी केलेल्या सूचना उपयुक्त होत्या. डॉ. अरुण टिकेकरांनी त्यांच्या खासगी ग्रंथसंग्रहातील दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे टिपा लिहिण्याचे काम सोपे झाले. श्री. रमेश शिंदे यांच्या संग्रहातील "गुलामगिरी" पुस्तकाच्या आवृत्त्या त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे “महात्मा फुले : समग्र वाङ्मय' या ग्रंथाच्या सुधारित चौथ्या आवृत्तीत काही मजकुराची भर टाकता आली. आधीच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये आढळलेले मुद्रणदोष काढून टाकण्याचाही प्रयत्न केला आहे. श्री. हरि नरके यांनी बारकाईने मुद्रित शोधनाचे काम पार पाडण्यात फार मोलाची मदत केली. १४ एप्रिल १९९१ रोजी हा ग्रंथ प्रकाशित व्हावा यासाठी तसेच तो विशेष सवलतीत उपलब्ध करून देता यावा यासाठी ना. शरदराव पवार, मुख्यमंत्री, ना. भारत बोद्रे, शिक्षण मंत्री, मा. दादासाहेब रूपवते, अध्यक्ष रोजगार हमी परिषद व कार्याध्यक्ष, महात्मा फुले पुण्यतिथी शताब्दी मध्यवर्ती समिती, ना. अनिल वहाडे, शिक्षण राज्यमंत्री, M