पान:Samagra Phule.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चौथ्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन १४ एप्रिल १९९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्त बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरू मानीत असत त्या महात्मा फुल्यांच्या समग्र वाङ्मयाची सुधारित चौथी आवृत्ती मराठी वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा एक सदस्य म्हणून १९८९ साली काम करीत असताना “महात्मा फुले : समग्र वाङ्मय' या ग्रंथाच्या सुधारित चौथ्या आवृत्तीचे संपादन करण्याची जबाबदारी मंडळाने माझ्यावर सोपवली. या ग्रंथाच्या १९६९ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीचे संपादन धनंजय कीर आणि डॉ. स. गं. मालशे या दोघा ज्येष्ठ अभ्यासकांनी केले होते. त्यानंतरच्या काळात महात्मा फुले समता प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या "पुरोगामी सत्यशोधक' या त्रैमासिकात डॉ. बाबा आढावांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा फुल्यांचे काही अनुपलब्ध लेखन तसेच सत्यशोधक समाजसंबंधीचे अस्सल कागदपत्र वेळोवेळी प्रकाशित केले. हा मजकूर जसा उपलब्ध होत गेला तसतसा तो “महात्मा फुले : समग्र वाङ्मय' या ग्रंथाच्या दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आला. मात्र दुर्दैवाने दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्तींचे संपादन करण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली होती असे दिसत नाही. पहिल्या आवृत्तीच्या संपादकांपैकी धनंजय कीर दिवंगत झाले असले तरी डॉ. मालशे यांच्याकडे हे काम सोपवता आले असते पण तसे झाले नाही. माझ्यावर जेव्हा संपादनाचे हे जिकिरीचे काम सोपवण्यात आले तेव्हा पहिल्या तीन आवृत्त्यांतील काही उणिवा दूर करण्याचे मी ठरवले. मूळ ग्रंथाच्या या सुधारित चौथ्या आवृत्तीत महात्मा फुल्यांचे लेखन कालक्रमानुसार प्रकाशित केलेले आढळेल. या ग्रथांत समाविष्ट केलेल्या फुल्यांच्या प्रत्येक पुस्तिकेचा परिचय करून देणारे संपादकीय टिपण आरंभी जोडलेले आहे. ही संपादकीय टिपणे लिहिताना त्या त्या पुस्तिकेचा संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर अप्रकाशित असलेले महात्मा फुल्यांचे लेखन तसेच अन्यत्र प्रसिद्ध झालेले पण या ग्रंथाच्या आधीच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये समाविष्ट न झालेले त्यांचे लेखन धुंडाळून जितके हाती लागले तितके या चौथ्या आवृत्तीत समाविष्ट केलेले आहे. मलबारी शेटजींच्या दोन टिपणांविषयी जोतीरावांनी इंग्रजीत व्यक्त केलेले मत तसेच त्यांचे काही 'अखंड' वाचकांना प्रथमच उपलब्ध करून दिलेले आहेत. अन्यत्र प्रसिद्ध झालेली महात्मा फुल्यांची काही पत्रे तसेच त्यांच्यासंबधी मामा परमानंदांनी रामचंद्र विठोबा धामणसकरांबरोबर केलेला पत्रव्यवहार या चौथ्या आवृत्तीत प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. आधीच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये जोतीरावांनी स्थापन केलेल्या शाळांसंबंधीच्या अस्सल कागदपत्र छापलेले नव्हते. या सुधारित चौथ्या आवृत्तीच्या एका परिशिष्टात या