Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब

१०७

 ब्राह्मण जोशी शूद्रानें घर बांधले म्हणजे घरभरणीच्या वेळी आपण ताजा स्वयंपाक खाऊन उरलेला शिळा पाक घरधण्यास ठेवून कसा जातो याविषयी

॥ अभंग ॥

पाया उन्हामध्ये बिगारी खांदिती |
टोपली वाहाती मलम्याची ॥ १ ॥
गगनी पाहाडी गवंडी चढती ॥
विटा त्या मांडिती गाऱ्यामध्ये ॥ २ ॥
माकडाचेपरी सुतार वेंगती ॥
लाकडे जोडिती काळाशीने ॥ ३ ॥
पोटासाठी सर्व यातना भोगिती ॥
नाही पोटी भीती कामकऱ्या ॥ ४ ॥
घामाचे पाझर थेंब टबकती ॥
सर्वदा झटती दया फुटे ॥ ५ ॥
श्रम पाहूनिया धनी खुष होती ||
वचन बा देती जेवणाचें ॥ ६ ॥
अशा जेवणास वास्तू नांव देती ॥
खुशामती येती अखेरीस ॥ ७ ॥

देऊनी मुहूर्त दिवस नेमिती ॥
नादी लावताती घरधनी ॥ ८ ॥

ब्राह्मणभोजन होम करविती ॥
ढाला उभारीती निशाणांच्या ॥ ९ ॥
थाप देऊनिया भोजन सारिती ॥
दक्षिणा ती घेती यथासांग ॥ १० ॥
संध्याकाळ झाला आशीर्वाद देती ॥
बुडवूनी जाती अज्ञान्याला ॥ ११ ॥

धनी कामगार तोंडाकडे पहाती ॥ 

शिळा पाक खाती सावकाश ॥ १२ ॥
भोळ्या भाविकाला ठक फसविती ॥
अधोगती जाती जोती म्हणे ॥ १३ ॥