Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

ब्राह्मण जोशी शूद्राच्या घरांत ऋतुशांतीच्या वेळीं अनुष्ठान वगैरे करून तूपपोळ्यांची चंगळ कशी उडवितो व दक्षिणा कशी घेऊन जातो याविषयीं
॥ अभंग ॥

ऋतू प्राप्त होता साधिती बा वेळ ॥
साहिना ती कळ उभा दारी ॥ १ ॥
दाविती उल्हास बोलून मंजूळ ॥
पोटी तळमळ द्रव्यलोभ ॥ २ ॥
सोडूनिया लाज विचारीती काळ ॥
पाही राशीबळ पंचागांत ॥ ३ ॥
जप अनुष्ठान स्थापिती निवळ ||
झटती केवळ जसे स्नेही ॥ ४ ॥
ब्राह्मणभोजन तूप चळचळ ||
दक्षिणा तुंबळ आधी बोली ॥ ५ ॥
फुकटचे खाती दाटविती नळ ||
करी मळमळ पाणी पीतां ॥ ६ ॥
धनी जेवताना उठे पोटशूळ ||
गुळवणी गूळ पाणी घाला ॥ ७ ॥
भोंदिती अज्ञानी गृह पाठबळ |
इहलोकी काळ पोटबाबू ॥ ८ ॥
आप्तसोयऱ्यांचा मेळवूनी मेळ ||
त्यागावे समूळ पाखांड्यास ॥ ९ ॥
प्रार्थना देवाची भोजन निर्मळ ||
सदा सर्वकाळ जोती म्हणे ॥ १० ॥