Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी

८९

शुद्रपोरां ट फ सांगून वेळ घालविती ।
गुरूचा हुद्दा चालविती।
आठ वाजल्या वेळ झाला मोठ्या घाईने येती ।।
खुर्ची आसनावर बसती।
ब्राह्मणाची मुले शिकवितां दहा वाजविती ।
सावली घड्याळा पाहती ।।
थकले बापे भाळावरचा घाम निरपिती ।
कपाळी बुक्या मारती ॥
टेबलावर हळूच पालथें डोके ठेविती ।
चाड काय पोरा दाखविती ॥
जेवण वेळ झाला मधींच दचकून उठती ।
शाळेला झटकन सोडीती॥
॥ चाल || जेवून झोपती गार ॥
नंतर न्युजपेपर ॥
लिहिती पत्र अखेर ।।
थंडाई पडल्यावर ॥
शाळेत जाती घडीभर ॥
शिकविती भावलें तर ॥
॥ चाल ॥ ब्राह्मण पंतोजी करती हो ।।
शुद्राच्या शिकण्याची माती हो ।
सांगतों तुम्हा प्रचिती हो।
माझ्या कुणब्या बोध करून रात्री पोथ्या वाचती ।
आपलें महत्व शिकविती ।।
भलतीच थाप देती सिध्यावर दक्षिणा घेती ।
मुले ती भलत्यांची शिकती ॥
सर्व जगाला शुद्ध नमुना पाहा ही राजनीति ।
शुद्राला उघड नाडीती ॥
विद्येसाठी पट्टी पैसा ब्राह्मण पंतोजी करिती ।
जगाचा संशय फेडिती ॥
महार जातीचे भूपति भूदेव मानिती ।
तेथे दासांची कोण गती ।।