महात्मा फुले : समग्र वाङ्मय
॥ चाल || ब्रम्हयास मधीं वर्णीती ही।
इतर धर्मास निंदिती हो।
नित्य बोधाची रीति हो।
शुद्र पोरा खोटा धर्म हळूच शिकविती ।
द्वेष राणीचा भरविती।
अशा तहेच्या कपटी लोका पंतोजी करिती ।
मुलें भलत्याची शिकती॥
स्वजातीचे चुकती परतुनी करती समजुती ।
शिक्षा बोधाने करिती ॥
परकी मुलें चुकता चापट्या गुद्दे मारिती ।
जोराने कान पिळती॥
शुद्र लेकरा मुका मार देऊन पळविती ।
ठेविती संख्येची भरती ॥
शाळांवरला वरिष्ठ येतां चोंबड़की करिती ।
करावा आर्जव तो किती।।
॥ चाल ।। जातीचे इनस्पेकतर ।
तपासी हाजरी मास्तर ।
गुणी म्हणे शाळा मास्तर ।
पंतोजी चढविला फार ॥
रपोटी फुगवी विस्तार ॥
गातों मी थोड्यांत सार ॥
॥ चाल ॥ शुद्राची जात वेडी हो ।
लिहिण्याची नाहीं गोडी हो ।
खोटीच लिहितो चहाडी हो ।
सिद्ध साधक होऊन करती जातीची बढती ।
कोणी घेईना याची झडती ॥
आंधळे दळती सर्व त्यांचे कुत्रे पीठ खाती ।
मुले ती भलत्यांची शिकती ।।
संध्या सोवळे नित्य बेताने पंतोजी करिती ।
हाजरी पोरें सारें घेती।।