या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
महात्मा फुले : समग्र वाङ्मय
॥ चाल ॥
महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ।
मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघड्याला ॥
सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाही पाऊसाला ॥
डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥
लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ।
लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी संपत्तीला । तरी बेतानें खर्च केला ॥
वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाही केला ।।
चतुर सावधपणाला । सोडिलें आधी आळसाला ॥
लहान मोठ्या पागेला । नाहीं कधी विसरला ॥
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला । नाहीं दुसरा उपमेला ।।
कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ।।
युक्तीने बचवी जीवाला । कधी भिईना संकटाला ।।
चोरघरती घेई किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥
पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ।।
युद्धी नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेई लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ॥
आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षा चपळाईची ॥
सुरेख ठेवण चेहऱ्याची । कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ॥