७७
दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला ।
करनाटकीं मुख्य केला ॥
हंबीरराव सेनापती हाताखालीं दीला ।
निघाला परत मुलखाला ॥
वाटेमधी लढून घेई बिलरि किल्ल्याला ।
तेथें ठेवी सुमंताला ॥
शिवाजीचे मागे व्यंकोजीनें छापा घातला ।
घेतलें स्वतां अपेशाला ॥
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला ।
शिवाजी रायगडी गेला ॥
विजापुरचा साय नेई राजे शिवाजीला ।
मोगल मुलखी सोडला ॥
मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळविला ।
सोडिलें नाहीं पिराला ॥
वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला ।
घाबरा अतिशय केला ॥
भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला ।
वाट पुढे चालूं लागला ॥
दुसरी फौज आडवी महाराज राजाला ।
थोडसे तोंड दिलें तिजला ॥
काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला ।
धुळ नाहीं दिसली शत्रूला ॥
फौजसुद्धा पोहंचला पहाटे किल्ल्याला ।
फसविलें आयदी मोगलाला ॥
विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला ।
आश्रय मागे शिवाजीला ||