Jump to content

पान:Samagra Phule.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा

औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला ।
धिंगाणा दक्षिणेत केला ।।
गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला ।
मोरोबा पठाण पंक्तीला ॥
लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला ।
जसा खरा मोड झाला ॥
तों मराटे पळती मोगल गर्वानं फुगला ।
आळसाने ढिला पडला ॥
गुजर संधी पाहून परत मुरडला ।।
चुराडा मोगलाचा केला ॥
बावीस उमराव पाडले रणभूमीला ।
नाहीं गणती शिपायांला ॥
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला ।
पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला ।
खिदाडी औरंगाबादेला ॥
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला ।
गोडबोल्या गोवी ममतेला ।।
एकसारखें औषध पाणी देई सर्वांला ।
निवडलें नाहीं शत्रुला ।।
जखमा बऱ्या होतां खुलासा सर्वांचा केला ।
राहिले ठेवी चाकरीला ॥
शिवाजीची र्कीर्ति चौमुलखीं डंका वाजला ।
शिवाजी धनी आवडला ॥
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।
हाजरी देती शिवाजीला ॥