पान:Samagra Phule.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(सहा) महात्मा फुले : समग्र वाङ्मय म. फुले यांनी सर्वप्रथम १८५५ साली तृतीय रत्न' हे नाटक लिहिले. 'शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे', हा संदेश त्यांनी या नाटकातून दिला जेव्हा आपल्या समाजात फार मोठा वर्ग निरक्षर होता, वाचू-लिहू शकत नव्हता तेव्हा सामाजिक प्रबोधनाचा मंत्र फुल्यांनी या नाटकाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडला. पुढे त्यांनी आपल्याला स्वाभिमानाची दीक्षा देणाऱ्या अस्मितापुरुष छत्रपती शिवाजीराजांचे गौरवगीत पोवाड्याच्या रूपाने गायले. महाराजांचा जाती-पातीविरहित समतावादी ध्येयविचार त्यांनी पोवाड्यातून गावोगाव नेला. 'गुलामगिरी' ते 'सार्वजनिक सत्य धर्म' या ग्रंथामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक प्रश्नोत्तरांची नाट्यपूर्ण लेखनपद्धती वापरली. 'मानव्याची आच' निर्माण करण्यासाठी माणूस प्रथम जागा केला पाहिजे, या जाणीवेने झपाटून जाऊन फुल्यांनी हे जीवनवादी साहित्य लिहिले. प्रश्नांचे मोहोळ जागे करण्यातच ज्ञानाचा उगम असतो सूत्र फुल्यांनी लेखनातून उचलून धरले. जोतीरावांनी आयुष्यभर धर्मग्रंथाची कठोर चिकित्सा केली. जातिव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला. स्त्री-पुरुष समतेची जीवनसृष्टी समाजाला देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ज्ञानाची, विद्येची महती समाजमनावर बिंबवली. 'स्त्रीशूद्रातिशूद्र' म्हणजे सर्व उपेक्षित समाज हा या देशाचा भाग्यविधाता आहे. शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे या ठोस भूमिकेतून त्यांनी शेतकऱ्यांचा असूड' लिहिला. शंभर वर्षांपूर्वी फुल्यांनी सहकाराचा कृतिशील पुरस्कार केला. कृषि औद्योगिकीकरणाचा, शेतीच्या अत्याधुनिकीकरणाचा ते आग्रह धरीत असत. शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी शेतकरी आंदोलने उभारली. शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर कोरडे ओढले, त्यातून त्यांनी ब्रिटिश सरकारलाही वगळले नाही. मुंबईत गिरणी कामगारांच्या संघटना उभारण्यासाठी आपल्या अनुयायांना प्रेरित केले. देवदासी, परित्यक्ता, भटके विमुक्त, दलित यांच्या मुक्तीसाठी चळवळी केल्या. कृतिशील लेखन केले. जेव्हा सगळे शिक्षणतज्ज्ञ 'फिल्टरेशन थिअरी' उचलून धरीत होते त्या काळात एकट्या फुल्यांनी या सिद्धांताचे वाभाडे काढले. प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक आणि सक्तीचे असले पाहिजे अशी मागणी करणारे फुले हे पहिले भारतीय होत. उच्चशिक्षणावर अवास्तव खर्च होत असल्याचे फुल्यांनी स्पष्टपणे सरकारच्या निदर्शनाला आणून दिले होते. 'शिक्षणाच्या आमूलाग्र पुनर्रचनेची' फुल्यांची मागणी आजच्या घडीलाही आपल्याला खूप काही शिकवणारी आहे. हंटर कमिशनसमोरील फुल्यांचे निवेदन हा शिक्षण पद्धतीचा मूलमंत्र देणारा दस्तऐवज आहे. लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमुळे शेतीवर पडणारा बोजा, तिचे होणारे तुकडे आणि पर्यावरणाच्या विनाशामुळे होणारा विध्वंस याकडे फुल्यांनी शंभर वर्षांपूर्वीच लक्ष वेधले होते. शेती किफायतशीर कशी होईल व शेतकऱ्यांचे दैन्य कसे दूर होईल, तो ज्ञानी, सुसंस्कृत भूमिपुत्र कसा बनेल याचाच त्यांना ध्यास होता. आज आपण पाणीवाटपाच्या प्रश्नावर चर्चा करतो.