पान:Samagra Phule.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने (सात) फुल्यांनी शेतकऱ्यांच्या असूडमध्ये सांगितले होते, 'पाणी वाचविण्यासाठी ठराविक आकाराच्या नळांद्वारे शेतकऱ्यांना ठराविक पाणी देण्यात यावे' याला म्हणतात द्रष्टेपण! अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झटणारे फुले, अंगारे-धुपारे करणाऱ्या विठोजी भुजबळावर तुटून पडतात. समाजामध्ये व्यसनमुक्ती यावी म्हणून मद्य वर्ण्य करून ग्रंथ खरेदी करण्याचा ते उपदेश करतात. महात्मा फुल्यांना समृद्ध आणि निकोप माणूस घडवायचा होता. त्याच्या सर्वांगीण जाणीवांमध्ये, अभिरुचीमध्ये त्यांना परिवर्तन करायचे होते. फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवून पहिली भारतीय शिक्षिका घडवली. त्यांना सार्वजनिक जीवनात आणले आणि भारतीय स्त्रीच्या कर्तृत्वाला कसा वाव दिला पाहिजे हे दाखवून दिले. फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीमधूनच पुढे आलेल्या ताराबाई शिंदे या मराठा बाईने १८८२ साली 'स्त्री-पुरुष तुलना' हा कसदार ग्रंथ लिहिला. स्त्री-पुरुष समतेची कणखर भूमिका या ग्रंथात त्यांनी आक्रमकपणे मांडली. पुढे १९२७ साली सत्यशोधक समाजाच्या सेक्रेटरी म्हणून 'सावित्रीबाई रोडे' यांनी समाजाचे नेतृत्व केले. अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील हौद खुला करणाऱ्या फुल्यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी संस्थाही सुरू केली होती. त्या शाळेत धुराजी आपाजी चांभार आणि गणू शिवजी मांग हे दोन दलित शिक्षक काम करीत असत हे या ग्रंथातील परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून दिसते. ब्राह्मण विधवांसाठी स्वतःची मिळकत खर्चापुरेशीही नसताना फुले ‘बालहत्या प्रतिबंधक गृह' स्थापन करतात आणि त्याच ठिकाणी जन्माला आलेला ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतात याबाबतचे या ग्रथांत समाविष्ट करण्यात आलेले कागदपत्र स्वतःच इतके बोलके आहेत की त्यावर काहीही भाष्य करण्याची गरज नाही. आज सर्वत्र चालू असलेल्या समाजपरिवर्तनाच्या कितीतरी चळवळींचा पाया महात्मा फुल्यांनी घातलेला असल्यामुळेच त्यांना 'पहिले नमन' केले जाते. फुल्यांचे स्त्री-शिक्षणाचे, शेतकरी विकासाचे, कृषि औद्योगिक जीवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली धडपड चालू आहे. महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रात भरीव पावलेही टाकली आहेत. अर्थात आजही 'नांगरल्याविना बरीच भुई पडलेली आहे' याची मला जाणीव आहे. अनेक आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत. त्यांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला या वाङ्मयातून मिळेल असा मला विश्वास वाटतो. राजर्षि शाहू, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव, महर्षि शिंदे, गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा देणारे महात्मा फुले आजही आपल्याला दिशा दाखवित आहेत. त्यांचा विचार आजही प्रस्तुत आहे. फुल्यांनी पुरस्कारलेला सर्वधर्मसमभाव हा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय विचार आहे. फुल्यांचा पुरोगामी विचार ठामपणे पुढे नेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे.