या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
महात्मा फुले : समग्र वाङ्मय
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस ।
उपमा नाहीं हिजड्यास ॥
सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास ।
परतला सिंहगडास ॥
डौलाने मोंगल भीती फिरवी तरवारीस ।
दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस ।
शत्रू पळाला भिऊन मारास ॥
करनाटकीं बदली धाडी शाइस्तेखानास ।
मुख्य केले माजमास ॥
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस ।
दावी भय पोर्चुगास ॥
सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास ।
हुल कसी दिली सर्वांस|
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस ।
दाखल झाला सुर्तेस ॥
यथासांग साहा दिवस लुटी शहरास ।
सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास ।
आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस ।
लागले हरणापाठीस ॥
घोड्या ठेच लागे उभयतां आले जमीनीस ।
शाहाजी मुकला प्राणास॥