पान:Aagarakar.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

नसतें. समाजनौकेला गति आणणारी शिडें असें आगरकरांनींच तरुणांचें वर्णन केलें आहे. महाराष्ट्राच्या आजच्या तरुण पिढीनें तें वर्णन सार्थ करून दाखावलें पाहिजे. आगरकरांचे चरित्र आणि वाङ्मय हीं दोन्हीं अशा तरुणांचें उत्कृष्ट मार्गदर्शन करतील. रफू करून अगर ठिगळें लावून जुन्या फाटक्या तुटक्या गोष्टी वापरीत बसणें असा आगरकरांनी सुधारणेचा कधीच अर्थ केलेला नाहीं. जें जें जीर्णतेमुळे निरुपयोगी होतें तें तें माणसाने फेंकून दिलें पाहिजे, अशीच त्यांची तेजस्वी शिकवण आहे. मग ती जीर्ण वस्तु राज्यपद्धति असो, समाजरचना असो, अथवा जीवनमूल्यें असोत. जुनें फेंकून द्यायला जें धैर्य लागतें तें बुद्धिवादाशिवाय सामान्य मनुष्याच्या अंगीं येणे शक्य नसतें. म्हणून बुद्धिवादाच्या पायावरच आजच्या महाराष्ट्रीय तरुणांनी आपलें विचारमंदिर उभारलें पाहिजे. मात्र आगरकरांचा बुद्धिवाद म्हणजे खा पी मजा कर असें प्रतिपादन करणारा आधुनिक सुखवाद नव्हे. मोठीं मोठीं सुबुद्ध व सुशिक्षित माणसें बुद्धिवादाच्या बुरख्याखालीं भोगवादी आयुष्य घालवून तरुणांची दिशाभूल करीत असतात. सामाजिक जीवनांतली ही आत्मवंचनेची जागा तरुण पिढीनें आरंभींच हेरून ती कटाक्षानें टाळली पाहिजे. बुद्धिवादाचा ध्वज तरुण पिढीनें अवश्यमेव हातांत घ्यायला हवा. पण त्याग हीच त्या निशाणाची काठी आहे आणि मनुष्यतेचें ऐहिक सुखसंवर्धन हेच तीन शब्द त्या निशाणावर कोरलेले आहेत याचा तिनें स्वतःला विसर पडूं देतां कामा नये. या शब्दांना बाध येईल असा कुठलाही विचार आपल्या मनांत येऊं नये अथवा त्या उदात्त शब्दांचे पावित्र्य दूषित होईल असा कुठलाही आचार आपल्या हातून घडूं नये, याबद्दल तिनें डोळ्यांत तेल घालून जपलें पाहिजे. प्रत्येक खरा सुधारक जसा मूर्तिभंजक तसाच मूर्तिपूजकही असतो. तो आचारांच्या आणि आदर्शांच्या जुन्या फुटक्या तुटक्या मूर्ती फेंकून देतो त्या कांहीं त्यांच्या जागीं बसून स्वतःची पूजा करून घेण्याकरतां नव्हे; तर त्या रिकाम्या जागीं नव्या अधिक सुंदर आचारांची आणि अधिक उदात्त आदर्शांची प्रतिष्ठापना करण्याकरतां. हा विवेक लक्षांत ठेवून महाराष्ट्राच्या

معام S