पान:Aagarakar.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोपाळ गणेश आगरकर अगदीं अपवादात्मक अशी आयुर्मर्यादा आगरकरांच्या वांट्याला आली असती तर आयुष्याच्या नव्वदींत त्यांनीं काय काय उद्गार काढले असते याचें कल्पनाचित्र मोठें मनोरंजक होईल यांत मात्र मुळींच संशय नाहीं. आगरकर आज असते तर बोलपटाच्या कलेचें त्यांनीं मोठ्या उत्साहानें स्वागत केलें असतें. मात्र या कलेचा उपयोग चमत्कारांनीं भरलेलीं संतचित्रें काढून अडाणी बहुजनसमाजाची अंधश्रद्धा वाढविण्याकडे होत आहे हें पाहून त्यांना फार वाईट वाटलें असतें. दम्यावर पेनिसिलीन या नव्या औषधाचा चांगला उपयोग होतो हें ऐकून त्यांना शास्त्राच्या प्रगतीचें कौतुक वाटलें असतें. पण ज्यांना धड अन्नसुद्धां खायला नाहीं अशा हजारों दमेकऱ्यांना हें औषध मिळण्याची व्यवस्था व्हायला नको काय असा प्रश्न विचारल्याशिवाय ते राहिले नसते. अमेरिकेंतली विजयालक्ष्मी पंडितांची कामगिरी पाहून आपलें एक सामाजिक सुखस्वप्न खरें झालें म्हणून ते हर्षभरित झाले असते; पण त्याबरोबरच भोवतालच्या असंख्य सुशिक्षित स्त्रियांच्या वेषभूषेच्या वेडाचा त्यानीं खरपूस समाचार घेतला असता. बंगालमधल्या भयंकर दुष्काळाच्या बातम्या ऐकून त्यांनी आपल्या तेजस्वी लेखणीनें जसा सरकारवर अग्निवर्षाव केला असता, तसेंच या चीड आणणाऱ्या गुलामगिरींत डोळे पुसत खितपत पडणाऱ्या भेकडांनाही त्यांनीं आपल्या वाग्बाणांनी जर्जर करून सोडलें असतें. आगरकर असते तर त्यांनीं जें जें केलें असतें तें तें करण्याची जबाबदारी आजच्या महाराष्ट्राच्या तरुण पिढीवर आहे. कुठलीही क्रांति केवळ इच्छा करून होत नाहीं; ती घडवून आणावी लागते.क्रांति ही स्वप्नाळु रसिकांच्या सुगंधी फुलांना भाळणारी देवता नाही; त्यागी भक्तांच्या सर्वस्वदानानें उफाळणाऱ्या अग्निज्वाळाच तिला प्रसन्न करूं शकतात! 'समाज ही कांहीं स्वतंत्र मूर्तिमंत वस्तु नाहीं. समाजांतील घटक हलले तर समाज हलतो, ते मंदावले तर तो मंदावतो आणि ते मागें हटूं लागले तर तो मागें हटूं लागतो?' असें आगरकर म्हणतात याचे रहस्य हेंच आहे. हें हलण्याचें-पुढें जाण्याचें-सर्व प्रकारच्या शृंखला तोडून स्वतंत्र होण्याचे कार्य म्हणजेच क्रांति! हें कार्य कुठल्याही पिढींतल्या वृद्धांकडून होणें शक्य