पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारताचा पराभव करता येत नाही हे पुन्हा सिद्ध झाले. जैसे थे करारानंतरच्या काळात पाकिस्तानने हैदराबादला स्पष्टपणे हे कळविले होते की, जर भारताने सेनाबलाचा वापर केला तर, पाकिस्तान भारताचा तीव्र निषेध करील पण सैनिकी साह्यता करू शकणार नाही. पाकिस्तानचे म्हणणे असे होते की, आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो? फार तर पाकिस्तान भारताशी युद्ध सुरू करील. ते काश्मीर प्रश्नावर चालूच आहे. पण त्यामुळे हैदराबादचा बचाव होणे शक्य नाही. म्हणून हैदरावादने स्वतःचा विचार स्वतः करणे बरे. हा प्रश्न युनोत न्यावयाचा असेल तर आम्ही संपूर्ण साह्य करू.

 ब्रिटनने मॉक्टन व माऊंट बॅटन यांच्या द्वारा तीन बाबी स्पष्ट केल्या होत्या. प्रथम म्हणजे ब्रिटन हैदराबादसाठी हस्तक्षेप करणार नाही, सैनिकी साह्यता सोडाच, पण शस्त्रसाह्यही देणार नाही, जगातील वडी राष्ट्रे याबाबत मध्ये पडणार नाहीत. कारण ब्रिटन भारताला राष्ट्रकुलाबाहेर जाण्यास भाग पाडणार नाही. ब्रिटनकडे असलेले हैदराबादचे पैसेसुद्धा भारत सरकारच्या संमतीविना हैदराबादला वापरता येणार नाहीत. दुसरी बाब म्हणजे ब्रिटन हैदराबादच्या प्रश्नावर तटस्थ राहील. युनोत पाठिंबा देणार नाही. तिसरी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे भारतासमोर चार-दोन आठवडेही टिकणे हैदराबादला शक्य नाही. आणि भारत सरकार शेवटी सैनिकी कारवाई करील हे नक्की समजावे. याच बाबी मेहदी नबाब जंग, मंजूर यारजंग, अलियावर जंग निजामाला आतून समजावीत होते. असेही म्हणतात की भोपाळच्या नबाबांनी आपला दूत पाठवून निजामाला हा सल्ला दिलेला होता की, भारताकडून मिळणाऱ्या सवलती तात्काळ स्वीकारा, नाहीतर भविष्य वाईट आहे. तरीही हैदराबाद भारतात सामील होण्यास तयार नव्हते. कासीम रजवी तर रोज मुंबई-मद्रास जिंकून, दिल्लीवर आसफजाही ध्वज फडकविण्याची भाषा बोलत होता. मधून मधून एक कोटी वीस लक्ष हिंदूंची कत्तल करून टाकण्याची भाषाही बोलत होता. कशाच्या जोरावर ही सारी मगरुरी चालली होती; कुणाचा आधार होता, हेच कळत नाही.

 एप्रिल १९४८ मध्ये माऊंट बॅटन यांना परतण्याचे वेध लागलेले होते, हैदराबाद प्रश्न अर्धवट ठेवून जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी एक शेवटची योजना तयार केली. त्या योजनेप्रमाणे निजामाने भारतात सामील व्हावे. त्यांना अंतर्गत कारभारात पूर्ण स्वायत्तता असावी. क्रमाक्रमाने व टप्प्या-टप्प्याने हैदराबाद राज्यात लोकशाही राजवट यावी असे ठरत आहे. नेहरू-पटेलांनी मोठ्या कष्टाने या योजनेला संमती दिली होती. तुरुंगात स्वामीजींच्या कानावर तपशिलाने ही योजना घालण्यात

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९६