पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काश्मिरात फौजा पाठविताच निजामाने हा करार मंत्रिमंडळाला मान्य नसल्याचे कळविले. यानंतर वाटाघाटीचे दुसरे पर्व सुरू झाले. वाटाघाटी अंतिमतः फसल्या तर आपण पाकिस्तानशी वाटाघाटी करू अशी धमकीही याच काळात दिली गेली. वाटाघाटीस पुन्हा आरंभ झाला व जैसे थे करारावर दि. २९ नोव्हेंबर १९४७ ला स्वाक्षऱ्या झाल्या.

 पाकिस्तान काश्मिरात विजयी होऊ शकत नाही. मंदगतीने का होईना पण पाक सैन्याची पिछेहाटच चालू आहे. पाकिस्तानची सेना भारतीय सेनेला तडाखा हाणू शकत नाही ही खात्री एव्हाना निजामाला पटली होती. कोणत्याही संस्थानाबाबत आपण जनतेची इच्छा प्रमाण मानू. त्या इच्छेला डावलून केलेली कृती आपण मान्य करणार नाही हे वेळोवेळी भारताने सांगितले होते. हे सांगणे म्हणजे केवळ भाषण नव्हते. जुनागढने हा इशारा डावलून पाकिस्तानात जायचे ठरविले. दि. १३ सप्टेंबर १९४७ ला जुनागढचे पाकिस्तानात सामीलीकरण पाकिस्तानने मान्य केले. जुनागढ प्रकरण युनोकडे न्यावे, असा माऊंटबॅटन यांचा सल्ला होता. तो नेहरू-सरदारांनी फेटाळला आणि फौजा पाठवून दि. ९ नोव्हेंबरला जुनागढचा ताबा घेतला. या घटनेमुळे हैदराबादला एक गोष्ट स्पष्ट झाली होती, जर हैदराबादने स्वतंत्र राहण्याचे ठरविलेच अगर पाकिस्तानात जायचे ठरविले तर भारताच्या सेना संस्थानात घुसतील, आणि त्यावेळी पाकिस्तान अगर ब्रिटन साह्य करू शकणार नाही. निजामाची तिसरी आशा भारतीय मुसलमान ही होती. जर वेळ आली तर ते बंड करतील ही शक्यता वरील दोन घटनांच्यामुळे मावळली होती. हा सारा सारासार विचार करूनच निजामाने जैसे थे करारावर स्वाक्षरी केली होती.

 जी धडपड त्रावणकोर, भोपाळने करून पाहिली ती हैदराबादने अधिक नेटाने केली. दीर्घकाळ केली इतकेच ह्या वेळपर्यंतच्या घटनांच्यावरून सांगता येईल. नसलेली स्वातंत्र्य निर्माण करण्याचा हा एक फोल प्रयत्न होता असे आपण म्हणू. पण जगण्याला संगती होती. जैसे थे कराराने दोघांनाही उसंत मिळाली होती. मिळाली उसंत स्वतःला बलवान करण्यासाठी वापरावी ही दोघांचीही इच्छा होती अखेर काश्मीर प्रश्नावर नेहरू युनोत गेले. आणि त्या जागतिक संघटनेच्या व्यासपी चर्चासत्राचा आरंभ झाला. हिवाळा संपताच मार्च १९४८ मध्ये पुन्हा लढाईला लागले. यावेळी पाकिस्तानचा प्रतिकार अधिक तीव्र जोरदार होता. पण पाकिस्तानची शक्ती कितीही वापरली तरी त्याचा परिणाम भारताची आगेकूच मंद करण्यात होतो.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९५