पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आली होती. पुढे स्वामीजी मला म्हणाले, या योजनेला कष्टाने संमती देताना आपण स्वातंत्र्याचे प्रेतही थडग्यात पुरून टाकत आहो असे मला वाटत होते. पण माझा निरुपाय होता. आपण जूनमध्ये परतत आहो त्यापूर्वी हैदरावाद प्रश्र जर संपला नाही तर आपल्या मागे भारतीय फौजाच तो प्रश्न सोडवतील. १९४८ सालचा काश्मीरातील ऑक्टोबर सहलीचा काळ येण्यापूर्वी भारतीय सैन्य हैदराबादचा प्रश्न संपवील. त्यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून मी जाण्यापूर्वी संधी करा असे परोपरीने माऊंटबॅटन सांगत होते. पण निजामाला ते पटले नाही. दि. २१ जून १९४८ ला माऊंटबॅटन परतले आणि वाटाघाटीही बंद झाल्या. हैदराबादभोवती भारतीय फौजा क्रमाने जमत होत्या, ही गंभीर परिस्थिती पाहून निजामाने पुन्हा वाटाघाटीची इच्छा दर्शविली. माऊंटबॅटन योजनेचा विचार करण्यास आपण तयार आहो हेही सुचविले. पण भारतीय प्रतिसाद त्याला मिळाला नाही. माऊंटबॅटन योजनेतील काही तत्त्वे आपण बदलण्यास तयार आहो असेही निजामाने सांगितले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. चोरटी शस्त्रे आणण्याचे सिडने कॉटनचे प्रयत्न, हैदराबाद प्रश्न युनोकडे नेण्याचा मोईन नवाज जंगाचा प्रयत्न हे खरे म्हणजे मुस्लिम जनतेचे धैर्य टिकविण्याचे प्रयत्न होते.

 दि. १३ सप्टेंबरला पोलिस अॅक्शन सुरू झाली. दि. १७ सप्टेंबरला हैदराबादचा पाडाव झाला. मनोधैर्य इतके खचलेले होते की, भारतीय सैन्याला प्रतिकार असा फारसा झालाच नाही. लष्कराने लढणे टाळले. रझाकारही कुठे लढले नाहीत. सेनेला अडविण्यासाठी पूल उडविले नाहीत. शिस्तीत माघारसुद्धा घेतली नाही. वाट फुटेल तिथे लोक पळाले. फौजा समोर येताच शरण आले. आततायी हेकटपणा म्हणावा तर चिवट प्रतिकार नाही. निदान काही काळ तर लपून घातपात करावे, तेही नाही. इतके जर मन कच्चे होते, सामर्थ्य दुबळे होते, तर वेळीच तडतोड करावी हेही नाही. अशी निजामाची व हैदराबादी नेत्यांची वागणूक राहिली. ह्या वागणुकीची संगतीच लागत नाही.

 तरीही या वेड्या आणि भेकड नेत्यांचे आम्ही ऋणी आहो. ते थोडे जरी समंजसपणे वागते तर आम्ही गुलामच राहिलो असतो. कायम गुलाम कुणीच राहात नाही हे खरे! पण तीन दशकांची गुलामी तरी तोंड दाबून सहन करणे भाग पडले असते. दुबळ्यांची उर्मट भाषा व अहंता आम्हाला आधार झाली हेच खरे.

***

(प्रकाशन : 'महाराष्ट्र टाइम्स' दि. १५-८-१९७२)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९७