पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकली व ध्वज झाकण्याचा प्रयत्न केला. तरी खालून ध्वज दिसत होताच. ध्वजावर शेरवानी पाहताच ह्या वीस मंडळींनी अखलाक हुसेनचा गळा धरला आणि त्याच्याशी झटण्यास आरंभ केला. पण गांजवे म्हणाले, आज ते माझे पाहुणे आहेत. मला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकला आणि नंतर काय करायचे ते करा. त्यामुळे अखलाक हुसेनची सुटका झाली पण वीस सशस्त्र लोकांचे कडे त्यांच्याभोवती राहिले. आपण शांततेसाठी झटलो हेच योग्य केले याचा नवा प्रत्यय रझाकार नेत्याला आला होता. आता येथून जिवंत कसे परतावे याचीच तो चिंता करीत होता.

 तिकडे मुसलमान लोक अखलाक हुसेनचे काय झाले या चिंतेत होते. एक शूर पोलिस इन्स्पेक्टर शहानवाज खान एकटाच हातात रिव्हॉल्व्हर घेऊन शेजारच्या घराच्या गच्चीवर गेला. तिथे जाऊन पाहतो तो अनेक पिस्तुले त्याच्यावर रोखलेली त्याला दिसली. त्याने रिव्हॉल्व्हर आपल्या पट्ट्यात बंद करून खाली यावे असे या वीस मंडळींनी फर्मावले. परिस्थितीचे गांभीर्य जाणून शहानवाज खानने आपले रिव्हॉल्व्हर पट्ट्यात बंद केले व उडी मारून तो जवळ आला. अखलाक हुसेनने त्याला सांगितले, मी सुरक्षित आहे. मला धोका नाही. पण लोकांना शांतपणे जाण्यास सांगा. नाही तर फुकट शेकडो लोक मरतील. तुम्ही मला निष्कारण गुंडांचा सरदार केले आहे. मला आता रक्तपात नको आहे. गांजवे माझे भाऊ आहेत. शहानवाज खान म्हणाला, तुम्ही तशी चिठ्ठी द्या. मी लोकांची समजूत घालतो. पण मला सुरक्षितपणे परत जाता येईल याची हमी हवी. वीस बेभान तरुण आता शहानवाजला सोडण्यास तयार नव्हते. पण गांजवे यांनी त्याला सुरक्षित परतू देण्याचे आश्वासन दिले. गांजवे म्हणाले ही वेळ आम्ही आणली नाही. रझाकारांनी आणली. आम्ही झेंडा काढणार नाही. बाकी दंगल, रक्तपात मलाही नकोच आहे. शहानवाज खान शेवटी अखलाक हुसेनची चिठ्ठी घेऊन परतला.

 अजून रझाकार उपप्रमुख नजीरअली आपल्या मंडळींची समजूत काढीत होता, मनधरणी करीत होता. इतक्यात एक उत्साही टोळके - सुमारे दीडशें मुसलमानांचे - अचानक कामधेनू जवळच्या चौकातून होळीकडे, शामराव बोधनकरांच्या घराकडे जाण्यास वळले. तेही सशस्त्र होते. नजीरअली लाऊडस्पीकरवरून ओरडून सांगत होता कुत्र्याच्या मरणाने मराल, तिकडे जाऊ नका. पण ऐकण्याच्या मनःस्थितीत रझाकार नव्हते. गल्लीच्या तोंडाजवळ हे टोळके येताच इशारा म्हणून रांजणीकरांच्या नेतृत्वाखालील गटाने कोरडे बार काढले. हा इशारा रझाकारांना पटला नसता तर गोळ्या झाडल्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८८