पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेवटी येणार येणार म्हणून गाजत असलेला रझाकार व मुसलमानांचा सशस्त्र जुलूस सायंकाळी चार वाजता सराफ्यातील पहिल्या चौकापर्यंत आला. सुमारे चार-पाच हजार लोक घोषणा करीत, नाचत, हवेत फैरी झाडत त्या मिरवणुकीत होते. रझाकारांचे उपनेते नजीर अली मिरवणुकीसोबत होते. गांजवे व अखलाक हुसेन तिसऱ्या मजल्यावर ध्वजाच्या दोन बाजूस होते. सर्व रझाकारांचे प्रमुख नेते आता तडजोड झाली आहे, शांतपणे जा हे समजावून सांगत होते. आणि झेंडा खाली घेऊन चालणार नाही, तो काढलाच पाहिजे, नसता सारा गाव जाळू, असे अनुयायी ओरडत होते.

 शांततेची ही तहान अखलाक हुसेन आणि नजीरअली यांना का लागावी? याचे कारण असे की, मिरवणूक रस्त्यावर दुतर्फा हिंदूंची उंच घरे व चांगली मजबूत. गावात तंग वातावरण असल्यामुळे रस्त्यावर हिंदू असणारच नाहीत. म्हणून मुसलमानांचे समूह सरळ गोळ्या व बॉम्बच्या टप्प्यात येतील. एखादा हॅन्डग्रेनेड शे-दीडशे मुसलमानांचा घात करील व मुसलमान कायमचे घाबरतील. शासनाला शांतता पाळण्याचे वरून कडक आदेश असताना स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे जाण्यास रझाकार नेते घाबरत होते. अनुयायांना इतका विचार करण्याची क्षमता कधी नव्हतीच. सडकेवरून निःशस्त्र हिंडणाऱ्या हिंदू प्रजेला अगर व्यापाऱ्यांना त्रास देणे जसे सोपे असते तसे सिद्धता असलेल्या गटावर हल्ला करणे सोपे नसते. नेत्यांना हे कळत असल्यामुळे शांततेची तहान अखलाक हुसेन ह्यांना लागलेली होती.

 वरून अखलाक हुसेन व खाली नजीरअली शांतपणे जा म्हणून अनुयायांना विनवीत आहेत. खाली हजार लोक पिसाटपणे झेंडा खाली ओढा म्हणून ओरडत आहेत, हवेत फैरी झाडत आहेत. शेजारी गांजवे शांतपणे उभे आहेत, असा प्रकार जवळजवळ तासभर चालू होता. कुणी तरी खालून गोळी झाडली. ती गांजव्यांच्या समोरून सूं ऽऽऽ आवाज करीत गेली. हिंदूंना वाटले गोळी गांजव्यांवर झाडली गेली. त्यांचा प्राण संकटात आहे. लगेच होळी भागातील अनेक घाटांवर एक एक माणूस बंदूक घेऊन उभा असल्याचे दृश्य दिसले. रझाकारांना प्रथमच आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे ह्याचा काही अंदाज आला आणि त्यांच्यात चलबिचल वाढली.

 सुमारे वीस तरुण हातात पिस्तुले घेऊन तिसऱ्या मजल्यावर गांजवे यांच्या रक्षणासाठी आले. त्यात बळवंतराव बोधनकर, विनायकराव डोईफोडे, गणपतराव सरसर ही माणसे प्रमुख होती. अखलाक हुसेन ह्यांचा समज असा झाला की, झेंडा झाकला तर लोक शांतपणे जातील, म्हणून त्यांनी ध्वजावर आपली शेरवानी काढून

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८७